मुंबई,
Mazi Ladki Bahin Yojana राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ सातत्याने मिळावा यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रक्रियेची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली असून, निर्धारित वेळेत ई-केवायसी न करणाऱ्या महिलांना पुढील महिन्यापासून योजनेचे १५०० रुपये मिळणार नाहीत, अशी अधिकृत माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व पात्र लाभार्थींनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लाभार्थी महिला Mazi Ladki Bahin Yojana योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर (ladakibahin.maharashtra.gov.in) जाऊन मोबाईलद्वारे घरबसल्या ई-केवायसी करू शकतात. यासाठी लाभार्थी महिलेचे आधार कार्ड तसेच पती किंवा वडिलांचे आधार कार्ड आवश्यक असून, त्याद्वारे ओळख पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.दरम्यान, विधवा तसेच ज्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे अशा महिलांना ई-केवायसी करताना अडचणी येत असल्याची तक्रार राज्य सरकारपर्यंत पोहोचली आहे. या संदर्भात महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी हस्तक्षेप करीत महत्त्वाची माहिती दिली. “ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत, त्यांच्या ई-केवायसीसाठी आवश्यक बदल लवकरच वेबसाइटवर करण्यात येतील,” असे त्या म्हणाल्या.
या बदलांनुसार मृत्यू दाखला किंवा घटस्फोटाची कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.अतिवृष्टीग्रस्त मराठवाडा, सोलापूर आणि धाराशीव जिल्ह्यांमध्ये अनेक महिलांची कागदपत्रे गहाळ झाल्यामुळे ई-केवायसीमध्ये अडचणी येत असल्याचेही समोर आले आहे. याबाबत विचार करत असल्याचे सांगून मंत्री तटकरे म्हणाल्या, “कुठलीही पात्र बहीण लाभापासून वंचित राहणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतली जाईल.”ई-केवायसीची अंतिम मुदत अवघी काहीच दिवसांवर येऊन ठेपली असल्याने सरकारकडून सर्व पात्र लाभार्थींना तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे अंतिम आवाहन करण्यात आले आहे.