वर्धा,
ab-form : गेल्या ६ दिवसांपासुन नगर पालिका निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीय सुरू झाली आहे. परंतु, वर्धा जिल्हा तेली विरुद्ध कुणबी यात विभागला असल्याने आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वसंध्येला मोजयाच इच्छूक नगरसेवकांच्या हाती एबी फॉर्म पडले आहेत. देवळीत नगराध्यक्षपदाकरिता भाजपाकडून शोभा तडस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उर्वरित नगरसेवक तसेच नगराध्यक्षपदाकरिता रात्री उशिरापर्यंत एबी फॉर्म देण्याची प्रक्रीया सुरू झाली नव्हती. त्यामुळे इच्छूकांमध्ये प्रचंड घालमेल सुरू आहे. एबी फॉर्म कोणाच्या नशिबात अशी चर्चा सुरू आहे. जिल्ह्यात अध्यक्षासाठी १३ तर सदस्यासाठी २३७ नामांकन दाखल करण्यात आले.
जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज रविवार १६ रोजी नामांकन दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी अध्यक्ष पदासाठी १३ तर सदस्य पदासाठी २३७ नामांकनपत्र दाखल झाले. जिल्ह्या ६ नगर पालिकेत ६ नगराध्यक्ष तर नगरसेवकाच्या १६६ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
जिल्ह्यात वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, देवळी व सिंदी रेल्वे येथे निवडणूक होणार आहे. आज रविवार १६ रोजी वर्धा नगर परिषदेत सदस्य पदासाठी ६० नामांकनपत्र, हिंगणघाट नगर परिषदेत सदस्य पदासाठी ८३, आर्वी नगर परिषदेत सदस्यपदाकरिता २१, देवळी नपत सदस्यपदाकरिता २२, पुलगाव नपत सदस्याकरिता ४३ तर सिंदी रेल्वे नगर परिषदेत सदस्य पदासाठी ८ नामांकनपत्र दाखल झाले.
तसेच हिंगणघाट येथे अध्यक्षपदासाठी ३ नामांकन पुलगाव व वर्धेत प्रत्येकी ४, देवळी येथे २ नामांकन असे १३ नामांकनपत्र दाखल झाले असल्याचे नगर पालिका प्रशासनाने कळविले आहे.
हिंगणघाट : आज १६ रोजी ३ उमेदवारांनी नगराध्यक्ष पदाकरिता तर ८३ उमेदवारांनी नगरसेवक पदाकरिता आपले नामांकन पत्र भरले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे, मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत उरकुडे, तहसीलदार योगेश शिंदे यांनी नामांकन पत्र दाखल करून घेतले.
नगराध्यक्ष पदाकरिता राकाँ शरद पवार गटाकडून शुभांगी डोंगरे, अपक्ष उमेदवार उरुवेला भगत, रीना परवीन बिस्मिल्ला खान यांनी नामांकन दाखल केले. सोबतच ८३ उमेदवारांनी नगरसेवका पदाकरिता नामांकन भरले. नगराध्यक्षाकरिता ४ तर ४० नगरपरिषद सदस्याकरिता १०५ नामांकन पत्र दाखल केले आहेत. सोमवार १७ रोजी नामांकन पत्र भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठी गर्दी राहणार असल्याचे बोलले जात आहे.