नागपूर,
sadgurudas-maharaj : जीवनात खरा आनंद मिळवायचा तर संत संगती आवश्यक आहे, असे प्रतिपादन धर्मभास्कर सदगुरूदास महाराजांनी केले. समर्थ श्री विष्णुदास महाराज अध्यात्म साधना रेशिमबाग केंद्राच्या वर्धापन दिन प्रसंगी सर्वेश्वर हनुमान मंदिरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संत आनंदाचे स्थळ, संत सुखाचे केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे शांती , ही ओवी घेऊन उदाहरणे देऊन भाविकांना सांगितले.
तुझीया वियोगे जीवित्व आले, शरीर बहु दुःख झाले, अज्ञान दारिद्रय माझे सरेना , तुजविण रामा मज कंठवेना, म्हणजेच सद्गुरूंची उपासना विसरल्यामुळे मी देहबुद्धीत अडकलो आहे, देहाला मी मानल्यामुळे आपल्याला कष्ट आले आहे. अज्ञानरूपी दारिद्रय आले आहे, त्यामुळे जीवनात शाश्वत आनंद मिळवायचा असेल आपल्याला संतांच्या विचारांचीच कास धरावी लागेल, त्यांनी आपल्या उद्भोधनात सांगितले. वर्धापन दिनाच्या उत्सवाची सुरवात विष्णुदास महाराज महात्म्य या पोथीच्या चक्री पारायणाने झाली.
महाराजांच्या उद्बोधनापूर्वी सकाळी चक्री पारायणात भाग घेतलेल्या पोथीवर चिंतनपर प्रवचन मुग्धा जोशी , श्रुतिका जोशी, नम्रता तिजारे, वनिता ढोले, स्मिता पाठक, अरुण मंडलेकर, किशोर कांत यांनी केले.
कविता वेलांकीवार यांचे कीर्तन झाले. यानंतर राजलक्ष्मी रिसालदार हिने नृत्य सादर केले. त्यानंतर प्रसिध्द गायक रघुनाथ बोबडे व त्यांच्या सहकार्यांनी भावपूर्ण भक्ती गीते म्हटली.त्यात मुग्धा जोशी, वनिता ढोले, रेखा उपगडे, कविता वेलंकीवार, संदीप गुरनुले , संदीप भोसले यांचा सहभाग होता. प्रमुख अतिथी श्रीपाद रिसालदार यांनी यथोचित मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.