वाशीम,
rangoli-competition : नगर परिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने स्वीप कार्यक्रमांतर्गत नगर परिषद निवडणूक विभाग आणि राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृतीपर विशेष रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
‘माझे मत — माझा अधिकार’ या महत्त्वपूर्ण संकल्पनेवर आधारित या स्पर्धेला वाशीमकर नागरिक व एनसीसी कॅडेट्सकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमास निवडणुक निर्णय अधिकारी वैशाली देवकर, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी निलेश पळसकर व निलेश गायकवाड, जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी संजय ससाने, नगर परिषदेचे स्वीप नोडल अधिकारी राहुल मारकड, सहायक नोडल अधिकारी दिक्षिता राठोड आणि पूनम साबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
एनसीसी विद्यार्थ्यांची मतदार जनजागृतीत रंगलेली कलाकृती
एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या नेतृत्वाखाली बाकलीवाल विद्यालयातील एनसीसी कॅडेट्सनी १५ नोव्हेंबर रोजी आपल्या घरासमोर मतदान जनजागृती दर्शविणार्या आकर्षक व संदेशप्रधान रांगोळ्या साकारल्या. नगरपरिषदेच्या सहायक नोडल अधिकारी दिक्षिता राठोड आणि पूनम साबळे यांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी भेट देत रांगोळ्यांचे निरीक्षण केले व त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.
स्पर्धेतील विजेते
निरीक्षणानंतर रांगोळी स्पर्धेचे विजेते घोषित करण्यात आले. प्रथम क्रमांक विघ्नेश वानखेडे, द्वितीय क्रमांक नम्रता इंगळे, तृतीय क्रमांक समीक्षा घुगे. विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्रे, सन्मानचिन्ह व बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.
लोकशाही मजबूत करण्याचा सामूहिक संदेश
या रांगोळी स्पर्धेद्वारे ’चला, मतदानाचा टक्का वाढवूया आणि सशक्त लोकशाही घडवूया!’ हा संदेश शहरभरात प्रभावीपणे पोहोचला. स्वीप उपक्रमांतर्गत झालेल्या या सर्जनशील जनजागृतीमुळे वाशीममध्ये मतदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.