पाटणा,
2029 Lok Sabha Elections बिहारमध्ये एनडीएच्या प्रचंड विजयाने आणि महाआघाडीच्या पराभवाने राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते उदित राज यांनी वादग्रस्त विधान करून नवा आरोप उभा केला आहे. त्यांचा आरोप आहे की बिहार निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गडबड झाली असून, 2029 मध्येही भाजपा ईव्हीएम आणि एसआयआर सारख्या यंत्रणांच्या मदतीने 400 पेक्षा जास्त जागा जिंकणार आहे.
उदित राज यांनी एएनआयशी संवाद साधताना तेजस्वी यादव यांच्या विजयावर सरळ प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, तेजस्वी यादव स्वतः जिंकले नाहीत, त्यांना भाजपा आणि निवडणूक आयोगाने जिंकवून दिले. संध्याकाळपर्यंत ते मागे होते. लोकांचा रोष वाढू नये म्हणून त्यांना पुढे केले. ते पुढे म्हणाले की हा संपूर्ण निवडणुकीचा निकाल आधीच ठरलेला होता. ज्याप्रकारे बिहारमध्ये एसआयआरच्या आधारे निकाल मिळवले गेले, तसाच प्रकार वापरून भाजपा 2029 मध्ये 400 जागा ओलांडेल,असा त्यांचा दावा आहे.
उदित राज यांनी वन नेशन वन इलेक्शनचा मुद्दाही पुन्हा उपस्थित करत म्हटले की 2027 किंवा 2029 पर्यंत केंद्र सरकार संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बदलू शकते. ईव्हीएम आणि नव्या पद्धतींच्या आधारे आता निवडणुकीचे निकाल आधीच ठरवले जातील. भारत चीन आणि रशियाच्या पद्धतीकडे जात आहे, असे त्यांनी म्हटले. त्यांचे विधान पुन्हा एकदा मोठ्या राजकीय वादळाला सुरुवात करत असून विरोधकांकडून या निवडणुकांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.