सऊदीतील दुर्दैवी दुर्घटना : ४५ उमरा यात्रेकरूंचा अंत, एकाची थोडक्यात सुटका

17 Nov 2025 13:37:45
मदिना, 
accident-in-saudi-arabia सौदी अरेबियात उमराह यात्रेला गेलेल्या भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. सोमवारी सकाळी मक्का ते मदिना या मार्गावर बसने डिझेल टँकरला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर काही क्षणात संपूर्ण वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या भयानक अपघातात किमान ४२ भारतीय प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे, तर पोलिस आयुक्त व्ही.सी. सज्जनार यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार मृतांची संख्या ४५ वर पोहोचली आहे. फक्त एकच प्रवासी जीव वाचवण्यात यशस्वी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
accident-in-saudi-arabia
 
मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये मोठ्या प्रमाणावर तेलंगणातील, विशेषतः हैदराबादमधील रहिवासी आहेत. ९ नोव्हेंबरला हैदराबादहून निघालेल्या या यात्रेकरूंमध्ये महिलांसह लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक माध्यमांच्या अहवालानुसार, पहाटे साधारण १.३० च्या सुमारास मदिनाजवळ हा अपघात झाला. बसने धडकेनंतर डिझेल टँकरमधून गळती सुरू झाली आणि एक ठिणगी पडताच क्षणार्धात आग दूरवर पसरली. प्रवासी त्या वेळी झोपेत असल्याने बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. accident-in-saudi-arabia या दुर्घटनेने देशभरात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेला “अत्यंत वेदनादायी” संबोधत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आणि जखमींच्या लवकर प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना केली. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीही अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत पीडित कुटुंबांना आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.
रियाधमधील भारतीय दूतावास आणि जेद्दाहमधील वाणिज्य दूतावास सौदी अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात असून आवश्यक ते सर्व सहकार्य पुरवत आहेत. जेद्दाहमध्ये २४x७ नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून मदतीसाठी विशेष हेल्पलाइन क्रमांक ८००२४४०००३ जारी करण्यात आला आहे. तेलंगणा सरकारनेही तत्परता दाखवत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी निवासी आयुक्तांची नियुक्ती केली आहे आणि राज्य सचिवालयात स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारला आहे. accident-in-saudi-arabia कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक जण मृतदेह भारतात आणण्याची आणि आवश्यक असल्यास सौदीत जाण्याची परवानगी देण्याची मागणी करत आहेत. हैदराबादचे रहिवासी मुफ्ती आसिफुल्लाह कासमी यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबातील सात जण या यात्रेत सहभागी होते आणि त्यांनी सरकारकडे तत्काळ मदतीची विनंती केली आहे. या दुर्घटनेमुळे सौदीतील उमराह यात्रेकरूंच्या सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले असून संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे.
Powered By Sangraha 9.0