पुणे,
Death under a moving train in Pune पुण्यात रविवारी रात्री झालेल्या एका भीषण रेल्वे अपघाताने शहर हादरले. मांजरी रेल्वे स्थानकाजवळील गोपाळपट्टी परिसरात भरधाव वेगाने सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनने तिघा तरुणांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या मृतदेहांचे तुकडे तुकडे झाल्याने परिसरात खळबळ उडाली.
मृत तरुणांची ओळख प्रथमेश नितीन तिंडे, तन्मय महेंद्र तुपे आणि तुषार शिंदे अशी करण्यात आली असून तिघेही पुण्यातील रहिवासी होते. अपघाताच्या वेळी पाच जण रेल्वे रुळांवर एकत्र उभे होते. ट्रेन जवळ येताच तिघे जण तिच्या मार्गात सापडले, तर उरलेले दोघे घाबरून घटनास्थळावरून पळून गेले.
घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस आणि रेल्वे पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन त्यांना ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या तरुणांनी रुळांवर कशासाठी जमाव केला होता, याबाबतची माहिती पोलिसांकडून गोळा केली जात आहे. दरम्यान, मृत तरुणांच्या कुटुंबीयांना ही दुःखद बातमी देण्यात आली असून अचानक झालेल्या या भीषण घटनेने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.