भारत-चीन दरम्यान १ फेब्रुवारीपासून थेट उड्डाणे!

17 Nov 2025 16:11:36
नवी दिल्ली,
Direct flights between India and China भारत आणि चीन दरम्यान थेट उड्डाणे पुन्हा सुरू होणार आहेत. आवश्यक नियम आणि मान्यता पूर्ण झाल्यानंतर १ फेब्रुवारी २०२६ पासून ही उड्डाणे सुरू होण्याची घोषणा एअर इंडियाने केली आहे. एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी या प्रक्षेपणाचे वर्णन फक्त एका मार्गाच्या शुभारंभापुरते मर्यादित न राहता दोन प्राचीन संस्कृती आणि आधुनिक आर्थिक शक्तींमधील पूल असल्याचे केले.
 
 

Direct flights between India and China
 
संग्रहित फोटो 
 
एअर इंडियाने दिलेल्या निवेदनानुसार, दिल्ली आणि शांघाय दरम्यान आठवड्यातून चार उड्डाणे सुरू केली जातील. ही उड्डाणे बोईंग ७८७-८ विमाने वापरून चालवली जातील, ज्यामध्ये १९ फ्लॅट-बेड बिझनेस क्लास सीट्स आणि २३८ इकॉनॉमी क्लास सीट्स असतील. एअर इंडियाचे कार्यकारी संचालक म्हणाले की, दिल्ली आणि शांघाय दरम्यान उड्डाणे पुन्हा सुरू करणे ही फक्त एका मार्गाचा शुभारंभ नाही, तर दोन प्राचीन संस्कृती आणि आधुनिक आर्थिक शक्तींमधील पूल आहे. जगातील सर्वात महत्त्वाच्या हवाई मार्गांपैकी एकाला पुन्हा जोडताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे प्रवास, व्यापार, शिक्षण, संस्कृती आणि इतर क्षेत्रांत संधी वाढतील.
 
२०२० पासून भारत आणि चीनमधील थेट उड्डाणे बंद करण्यात आली होती. अलीकडेच दोन्ही देशांमधील संबंधांवरील तणाव कमी झाल्यानंतर पुन्हा हवाई उड्डाणे सुरू करण्याचा करार झाला आहे. एअर इंडियाने २००० मध्ये पहिल्यांदा चीनसाठी नॉन-स्टॉप उड्डाणे सुरू केली होती. या उड्डाणांच्या वेळा विमान क्रमांक A१३५२ दिल्लीहून शांघायकडे रवाना होईल, दुपारी १२ वाजता निघून रात्री ८.२० वाजता शांघायमध्ये पोहोचेल. ही उड्डाणे मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवारी असणार आहे. तर विमान क्रमांक A१३५१ शांघायहून दिल्लीकडे रात्री १० वाजता निघून दुसऱ्या दिवशी सकाळी ३.१५ वाजता दिल्लीत पोहोचेल आणि ती देखील मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवारी असेल.
Powered By Sangraha 9.0