तीन पासपोर्ट, तीन पत्ते, यूएईत नोकरी, पाकिस्तान-तुर्की दौरे आणि...

17 Nov 2025 12:57:31
नवी दिल्ली,
Dr. Shaheen Pakistan-Turkey tour दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणाच्या चौकशीत अटक झालेल्या डॉ. शाहीन सईद यांच्याबद्दल तपासयंत्रणांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. १९९६ पासून त्यांनी तीन पासपोर्ट घेतले असून, प्रत्येक पासपोर्टवर वेगळा पत्ता नोंदवलेला असल्याचे समोर आले आहे. वारंवार करण्यात आलेले पत्ते बदल, पासपोर्टचे मुदतपूर्व नूतनीकरण आणि परदेश प्रवासांची मालिका यामुळे तपास अधिकाधिक गडद होत आहे. शाहीनने पहिला पासपोर्ट १९९६ मध्ये घेतला होता. त्यावरचा पत्ता कंधारी बाजार, कैसरबाग–लखनऊ असा होता. २००६ मध्ये मिळालेल्या दुसऱ्या पासपोर्टवर पत्ता बदलून जीएसव्हीएम मेडिकल कॉलेज, कानपूर करण्यात आला. २०१६ मध्ये मिळालेल्या तिसऱ्या पासपोर्टवर पुन्हा पत्ता बदलून लखनऊतील भावाच्या घरी नोंदवला गेला. याच पासपोर्टचा वापर करून त्या थायलंड, सौदी अरेबिया आणि नंतर युएईत नोकरीसाठी गेल्या. २०१६ ते २०१८ या काळात त्यांनी युएईमध्ये काम केले आणि याच काळात त्या जैश-ए-मोहम्मदच्या संपर्कात आल्याचा आरोप एजन्सींनी केला आहे.
 

डॉक्टर शाहीन 
 
 
तपासात उघड झाले की तिसऱ्या पासपोर्टची वैधता २०२६ पर्यंत असूनही त्यांनी मार्च २०२५ मध्ये तो नूतनीकरण केला. पत्ता पुन्हा एकदा बदलला आणि नूतनीकरण केलेल्या पासपोर्टमध्ये वडिलांचे नाव काढून भावाचे नाव परवेझ लिहिले गेले. या बदलांकडे तपास संस्था संशयाच्या नजरेने पाहत आहेत. याचदरम्यान तिच्या ऑनलाइन गतिविधी, परदेशातील संपर्क आणि संशयास्पद संवाद तपासयंत्रणांच्या रडारवर आले आहेत. दिल्ली पोलिस आणि एनआयएने मिळून केलेल्या तपासात लाल किल्ला स्फोट मॉड्यूलमधील काही व्यक्तींशी तिचा डिजिटल संपर्क आढळला आहे. यामुळे शाहीनची भूमिका थेट होती की ती माहिती पुरवणारे माध्यम बनली होती याचा शोध घेतला जात आहे.
 
दरम्यान, पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदने हवालाद्वारे शाहीनला २० लाख रुपये पाठविल्याचेही समोर आले आहे. हा पैसा उत्तर प्रदेशातील हापूर आणि सहारनपूरमध्ये दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे उघडण्यासाठी वापरला जाण्याची योजना होती. २०२२ मध्ये त्या तुर्कीला गेल्या होत्या आणि तिथे दहशतवादी हँडलर्सशी त्यांची भेट झाली होती, अशी माहितीही पुढे आली आहे. शाहीनच्या नावावर एकूण सात बँक खाते असून त्यामधून १.५५ कोटींचे व्यवहार झाले आहेत. या आर्थिक हालचालींची चौकशी अधिक तीव्र केली आहे. उत्तर प्रदेश एटीएसने आतापर्यंत २४ हून अधिक लोकांची चौकशी केली असून अनेक संशयित अजूनही ताब्यात आहेत. फरिदाबाद मॉड्यूलमध्ये शाहीनला “मॅडम सर्जन” या कोड नावाने संबोधले जात होते. त्यांच्या व्हॉट्सअॅप चॅटमधील संदेशांत “औषध” हा शब्द स्फोटकांसाठी आणि “ऑपरेशन” हा शब्द दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. “मॅडम एक्स” आणि “मॅडम झेड” नावाने सेव्ह केलेल्या दोन नंबरवरून तिला सतत सूचना मिळत होत्या. या दोघींचे संबंध भारतातील आहेत की पाकिस्तानातील, याचा शोध घेतला जात आहे.
Powered By Sangraha 9.0