आता तरी शामिला संघात घ्या!

17 Nov 2025 11:16:32
कोलकाता,
Get Shamila on the team कोलकात्यातील पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा पराभव अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. भारताची ताकद म्हणून ओळखली जाणारी फिरकी आता खरोखरच कमकुवत झाली आहे का? भारताने घरच्या मैदानावर स्पिनिंग ट्रॅक तयार करणे थांबवले पाहिजे का? अवघ्या तीन दिवसांत कसोटी संपून ३० धावांनी पराभव पत्करल्यानंतर ईडन गार्डन्सच्या पिचवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली यांनी पिचवरील सर्व आरोप फेटाळून टाकत टीम इंडियाला कडक सल्ला दिला आहे.
 

mohammed shami 
 
गांगुली म्हणाले की, ईडन गार्डन्सची खेळपट्टी भारतीय संघाने मागणी केलेल्या प्रमाणेच तयार करण्यात आली होती. परंतु घरच्या मैदानावर वर्चस्व मिळवण्यासाठी पिचमध्ये जाणीवपूर्वक छेडछाड करणे थांबवले पाहिजे. चांगली पिच अशी असावी की फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही संधी मिळावी, ज्यावर ३५०+ धावा करता येतील आणि गोलंदाजांनाही विकेट मिळवण्याचा आत्मविश्वास मिळेल. गांगुली पुढे म्हणाले की, गौतम गंभीरने खेळपट्टी बदलण्याऐवजी आपल्या गोलंदाजी सामर्थ्यावर विश्वास ठेवायला हवा. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज चांगली गोलंदाजी करत आहेत, त्याचप्रमाणे मोहम्मद शमीसारखा अनुभवी गोलंदाज संघात असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शमीमध्ये भारताला एकहाती सामना जिंकवण्याची क्षमता आहे. गांगुलींच्या या विधानावरून स्पष्ट होते की, ते कसोटीसाठी विशेष स्पिन पिचची मागणी योग्य मानत नाहीत.
 
 
कसोटी नंतर गंभीर यांनी स्पष्ट केले की त्यांना हवी तशीच पिच मिळाली होती. क्यूरेटरने पूर्ण सहकार्य केले, १२४ धावा म्हणजे सहज पाठलाग करता येण्यासारखा स्कोअर होता, आणि भारताचा पराभव हा खराब खेळामुळे झाला, पिचमध्ये काही दोष नव्हते, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तरीही, २०२४ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. स्पिन पिचची मागणी केली आणि त्याचा फटका भारतीय संघालाच बसला. सध्या शमी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय असूनही फिटनेस निकषांमुळे त्याला संघात स्थान मिळालेले नाही. ६४ कसोट्यांमध्ये २२९ बळी घेणारा शमी शेवटचा कसोटी सामना २०२३ मधील WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. गांगुलींच्या मते, शमीसारखा अनुभवी गोलंदाज संघात असणे भारतासाठी महत्त्वाचे आहे, कारण तो एकहाती सामना जिंकवण्याची ताकद ठेवतो.
Powered By Sangraha 9.0