मुंबईतील फ्रेंच दूतावासात कार्यरत महिलेचा विनयभंग!

17 Nov 2025 14:42:18
मुंबईत,
French Embassy in Mumbai मुंबईसारख्या सुरक्षित शहरात वांद्रे परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फ्रेंच दूतावासात काम करणाऱ्या २७ वर्षीय महिलेला रात्री उशिरा घरी परतताना विनयभंगाचा सामना करावा लागला. ८ नोव्हेंबरच्या रात्री पाली हिल भागातून पायी जात असताना, स्कूटरवरून आलेल्या एका तरुणाने तिचा पाठलाग करून तिला थांबवले आणि विनयभंग करून पळ काढला. फ्रेंच दूतावासाने १४ नोव्हेंबर रोजी खार पोलिसांकडे तक्रार नोंदवली. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. परिसरातील ५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर, आरोपी सुनील वाघेला (वय २५) याची ओळख पटली. शनिवारी रात्री धारावीतील त्याच्या घरी छापा टाकून त्याला अटक करण्यात आली.
 
 

mumbai police
घटनेच्या गांभीर्याचा विचार करून डीसीपी दीक्षित गेडाम यांनी एसीपी आदिकराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार केले. या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारावर आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेतला आणि तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत त्याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार वाघेला हा धारावीमधील भंगार विक्रेता आहे. रात्री उशिरा वांद्रे परिसरात तो कशासाठी आला होता, तसेच तो पीडितेचा पूर्वीपासून पाठलाग करत होता का, याबाबतही तपास सुरू आहे. पोलिसांना मिळालेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये आरोपी स्कूटरवरून त्या महिलेचा पाठलाग करताना आणि विनयभंगानंतर पळून जाताना स्पष्ट दिसतो. आरोपीवर आयपीसीच्या संबंधित कलमान्वये खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यासाठी पोलिस पथक त्याच्या घरी पोहोचले तेव्हा कुटुंबीय आणि इतर लोकांनी गोंधळ घातला, परंतु पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. रविवारी आरोपीला वांद्रे हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आले असून त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0