नगराध्यक्षासाठी १५ तर नगरसेवक पदासाठी २४६ उमेदवारी अर्ज

17 Nov 2025 17:19:02
कारंजा लाड, 
Karanja Lad Municipal Council Election नगरपरिषद निवडणुकीत यंदा स्पर्धा चांगलीच तापली असून, नगराध्यक्ष पदासाठी तब्बल १५ उमेदवारांनी अर्ज दाखल करून रस्सीखेच अधिकच तीव्र केली आहे. यंदा नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलासाठी राखीव असल्याने अनेक राजकीय घराण्यांची समीकरणे बदलली आहेत,तर नवे चेहरेही मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरले आहेत. दुसरीकडे नगरसेवक पदासाठी २४६ अर्ज दाखल झाल्याने प्रत्येक प्रभागात चुरस वाढली आहे. ३१ जागांसाठी इतया मोठ्या संख्येने अर्ज येणे ही कारंजा नगरपरिषद निवडणुकीत अभूतपूर्व बाब मानली जात आहे.
 
 
 
Karanja Lad Municipal Council Election
 
अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीनंतर आता निवडणुकीचा पुढील टप्पा सुरू होत असून १८ नोव्हेंबर रोजी नामांकनपत्रांची छाननी होणार आहे. सदर छाननीत अनेक उमेदवारांचे राजकीय भविष्य ठरणार आहे. यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली असून या दिवशी अंतिम रिंगण स्पष्ट होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी एक आणि नगरसेवक पदासाठी ३१ जागांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून शहरातील सर्व राजकीय गोटांमध्ये रणनीती, गठबंधन, पॅनेल संगनमत आणि स्थानिक समीकरणे पुन्हा आखली जात आहेत.मतदाना नंतरच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजे ३ डिसेंबरला मतमोजणी होणार असून कारंजा नगरपरिषद कोणाच्या हातात जाणार, याचे चित्र स्पष्ट होईल. यंदा नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्याने महिला उमेदवारांची संख्या वाढली असून अनेक घराघरांतील महिला आता थेट शहराच्या राजकीय नेतृत्वाच्या स्पर्धेत उतरल्या आहेत. पारंपरिक गटबाजीसोबतच महिलांच्या नेतृत्वाचा वेगळा प्रभाव शहराच्या निवडणुकीत दिसून येत आहे.
 
 
शेकडो नगरसेवक अर्जांना दिलेला प्रतिसाद, नगराध्यक्ष उमेदवारांची लढत आणि बदलत्या पॅनेल गठबंधनांमुळे शहरात निवडणुकीचे वातावरण अत्यंत रंगतदार बनले आहे. गेल्या निवडणुकांच्या तुलनेत या वेळी स्पर्धा अधिक बहुआयामी, प्रभावी आणि अनिश्चित असल्याचे चित्र पहिल्याच टप्प्यात स्पष्ट झाले आहे. २ डिसेंबरच्या मतदानाची आणि ३ डिसेंबरच्या निकालाची शहरवासीयांना आतुरता लागली असून, पुढील काही दिवस कारंजा शहरात निवडणूक चर्चांचा तुफान भडका पाहायला मिळणार यात शंका नाही. 
Powered By Sangraha 9.0