द्रविडनंतर संगकाराची एंट्री! राजस्थान रॉयल्सचा मोठा बदल

17 Nov 2025 13:09:20
नवी दिल्ली,
Kumar Sangakkara coach of Rajasthan Royals राजस्थान रॉयल्सकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. राहुल द्रविड यांच्या निवृत्तीनंतर आता संघाची धुरा श्रीलंकेचा माजी कर्णधार, यष्टिरक्षक-फलंदाज आणि जगातील महान क्रिकेटपटूंमध्ये गणले जाणारे कुमार संगकारा सांभाळणार आहेत. आयपीएल २०२६ हंगामासाठी संगकारा यांची राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएल २०२५च्या आधीच संघाने त्यांना क्रिकेट संचालक म्हणून जबाबदारी दिली होती, परंतु आगामी हंगामासाठी ते पुन्हा मुख्य प्रशिक्षक म्हणून परतत आहेत. संगकारा यापूर्वी २०२१ ते २०२४ दरम्यान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांच्या जागी २०२५ साठी राहुल द्रविड यांना संधी देण्यात आली होती. मात्र, आयपीएल २०२५ मध्ये राजस्थानचा निराशाजनक प्रवास १४ पैकी फक्त ४ विजय आणि पॉइंट्स टेबलमध्ये नववे स्थान यात सुधारणा करण्यासाठी द्रविड यांनी पदाचा राजीनामा दिला.
 
 
 
Kumar Sangakkara coach
मुख्य प्रशिक्षकपदी पुनरागमन करताना संगकारा म्हणाले, या पदावर परत येणे माझ्यासाठी सन्मान आहे. संघातील प्रतिभावान खेळाडूंना आणि अनुभवी प्रशिक्षक मंडळींना एकत्र घेऊन आम्ही मजबूत संघ उभारू. विक्रम, ट्रेवर, शेन आणि सिड—सर्वांकडे अपार अनुभव आहे. आमचे ध्येय स्पष्ट आहे: अधिक सक्षम संघ तयार करणे आणि सर्वोत्तम कामगिरी करवून घेणे. संगकाराच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने २०२२ मध्ये अंतिम फेरी गाठली होती आणि २०२४ मध्ये प्लेऑफमध्येही पोहोचले होते. आता पुन्हा एकदा संघाला विजेतेपदाच्या दिशेने नेण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येणार आहे.
 
दरम्यान, राजस्थान रॉयल्ससमोर आता नवे आव्हान उभे राहिले आहे. नवीन कर्णधाराची निवड. संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्जमध्ये दाखल झाल्यानंतर संघाकडे नेतृत्वाची जागा रिक्त झाली आहे. यशस्वी जयस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल यांसारखे तरुण खेळाडू तसेच अनुभवी रवींद्र जडेजा संघात असले तरी, अंतिम निवड कोणावर होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी आयपीएल हंगामात संगकारा-नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स कोणता नवीन अध्याय लिहिते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
Powered By Sangraha 9.0