इगतपुरी,
Shinde group ऐन निवडणुकीच्या तोंडावर इगतपुरीमध्ये शिवसेना (शिंदे गट) ला मोठा धक्का बसला आहे. तालुका उपाध्यक्ष, शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षातून सामूहिकपणे राजीनामा दिला असून, त्यांनी ठाकरे गटातील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
पदाधिकाऱ्यांच्या मते, भाजपच्या काशिनाथ चौधरींना आधी पक्षात घेतले आणि नंतर स्थगिती दिल्याने तसेच पालघर साधू हत्या प्रकरणात भाजपकडून आरोपांची भूमिका घेतल्याने ते नाराज झाले होते. त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, निवडणूक प्रक्रियेत स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विश्वास न घेता परस्पर उमेदवार जाहीर करण्यात आले, तसेच पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून, बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्याने हा निर्णय घडला. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्यांना तिकीट न देता बाहेरून आलेल्यांना प्राधान्य देणे आणि काही वरिष्ठ नेत्यांचा स्वार्थाचे राजकारण हे या निर्णयामागील मुख्य कारण आहे. “आम्ही दोन वर्षांपासून पक्ष उभारण्यात मेहनत घेतली, मात्र आमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करून निर्णय घेण्यात आला,” असे ते म्हणाले.
राजीनामा दिल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष डी. जी. सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत शिवसेना (उबाठा) मध्ये प्रवेश केला आहे. नव्या पक्षात सामील झालेल्या इच्छुकांना उमेदवारीही दिल्याची माहिती मिळाली आहे.
इगतपुरीतील Shinde group राजकीय समीकरणांना या घटनांनी नवीन वळण दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बिगुल वाजताच विरोधी पक्षावर खिंडार दिसत होता; मात्र आता निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या सामूहिक राजीनाम्यामुळे तालुक्यातील राजकीय परिस्थिती धक्कादायक बनली आहे.विशेषतः, इगतपुरी तालुक्यातील एकनाथ शिंदे यांच्या सत्तेस हा धक्का मानला जात आहे. आगामी निवडणुकीत या राजकीय हलचालीमुळे पक्षाच्या उमेदवार निवडीवर आणि मतदारांच्या मतांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.