नवी दिल्ली,
Sheikh Hasina said बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT) दिलेल्या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हसीना यांनी न्यायालयाचा निर्णय “फसवणुकीवर आधारित, पक्षपाती आणि अलोकतांत्रिक” असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, न्यायाधिकरण एक अंतरिम सरकार चालवत आहे ज्याला लोकशाही आदेश नाही आणि ज्यांचे निर्णय स्पष्टपणे राजकीय हेतूंनी प्रेरित आहेत. हसीनांच्या मते, त्यांच्या विरोधातील मृत्युदंडाची शिफारस हे अंतरिम सरकारमधील अतिरेकी घटक अवामी लीग आणि निवडून आलेल्या पंतप्रधानांना संपवण्याचा कट रचत असल्याचे दर्शवते.
शेख हसीना म्हणाल्या की, डॉ. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारचा अराजक आणि सामाजिकदृष्ट्या प्रतिगामी कारभार देशातील लाखो नागरिकांना त्रस्त करत आहे. त्यांच्या मते, आयसीटी खटल्यांचा उद्देश न्याय मिळवणे किंवा जुलै-ऑगस्ट २०२५ मधील घटनांबाबत सत्य उघड करणे नव्हता; उलट, अवामी लीगला बळी बनवणे आणि अंतरिम सरकारच्या अपयशांकडे जागतिक लक्ष वळवणे हा होता.शेख हसीना यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले, “मोहम्मद युनूसच्या राजवटीत सार्वजनिक सेवा कोलमडल्या आहेत. देशातील गुन्हेगारीने भरलेल्या रस्त्यांवरून पोलिस मागे हटले आहेत आणि न्यायिक निष्पक्षतेला धक्का बसला आहे. अवामी लीग समर्थकांवर हल्ले होत आहेत, तसेच हिंदू आणि इतर धार्मिक अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत, महिलांच्या हक्कांचे दमन केले जात आहे. प्रशासनातील इस्लामिक अतिरेकी, ज्यात हिज्बुत-तहरीरचे नेतेही आहेत, बांगलादेशच्या धर्मनिरपेक्ष शासनाच्या परंपरेला कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
हसीना यांनी असेही सांगितले की, युनूसच्या नेतृत्वाखालील सरकारच्या आश्रयाखाली इस्लामिक अतिरेकी सक्रिय आहेत, पत्रकारांना अटक केली जात आहे, आर्थिक विकास थांबला आहे आणि निवडणुका जाणूनबुजून पुढे ढकलल्या जात आहेत. देशातील सर्वात जुना पक्ष निवडणूक प्रक्रियेतून वगळला गेला आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमे, स्वयंसेवी संस्था आणि स्वतंत्र संस्थांकडे याचे पुरावे असून, IMF च्या अहवालात देखील या समस्यांकडे लक्ष वेधले गेले आहे. तरीही, आंतरराष्ट्रीय समुदायाने या सरकारला मान्यता दिलेली आहे, जरी देशातील नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला गेला नाही. शेख हसीना म्हणाल्या की, बांगलादेशच्या लोकांच्या हितासाठी पुढील निवडणूक मुक्त, निष्पक्ष आणि समावेशक असणे आवश्यक आहे.
या प्रकरणात शेख हसीना यांच्यासह तत्कालीन गृहमंत्री असदुज्ज्झमान खान कमाल आणि पोलिस प्रमुख अब्दुल्ला अल-मामुन यांनाही दोषी ठरवण्यात आले. मात्र चौधरी अब्दुल्ला अल-मामुन यांनी सरकारी साक्षीदार म्हणून पूर्ण माहिती दिल्याने त्यांची शिक्षा कमी करण्यात आली. ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या हत्याकांडात शेख हसीना या मुख्य सूत्रधार असल्याचे न्यायालयाने ठरवले. सत्तापालटानंतर हसीना भारतात आश्रयाला गेल्या होत्या आणि गेल्या १५ महिन्यांपासून त्या तेथे राहात आहेत. या संपूर्ण खटल्याची २८ कामकाजाच्या दिवशी सुनावणी झाली. २३ ऑक्टोबर रोजी प्रक्रिया पूर्ण झाली आणि एकूण ५४ साक्षीदारांनी न्यायालयासमोर हजेरी लावून आपली साक्ष नोंदवली.
या सर्व पुरावे आणि साक्षांच्या आधारे न्यायालयाने कठोर निर्णय दिला. न्यायालयाच्या निकालात म्हटले आहे की, पंतप्रधान पदावर असताना शेख हसीना यांनी प्राणघातक शस्त्रे आणि हेलिकॉप्टर वापरण्याचे आदेश दिले आणि त्यामुळे मानवतेविरुद्ध गंभीर गुन्हे घडले. वरिष्ठ कमांडिंग पद असल्याने या घटनांची जबाबदारी थेट त्यांच्यावर येते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. पोलिस प्रमुख अल-मामुन यांनी सरकारी साक्षीदार बनून संपूर्ण माहिती दिल्याने, त्यांच्यावर मृत्युदंडाची तरतूद असतानाही न्यायालयाने सौम्य भूमिका घेत त्यांची शिक्षा कमी ठेवली. बांगलादेशाच्या राजकारणात मोठे भूचाल घडवणारा हा निर्णय असून या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे संपूर्ण उपखंडाचे लक्ष लागले आहे.