मुंबई,
Sherlyn Chopra removes breast implants बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आली असून यावेळी त्यामागे तिचा लूक किंवा बोल्ड अवतार नाही, तर तिने केलेला मोठा वैयक्तिक निर्णय कारणीभूत ठरला आहे. शर्लिनने अलीकडेच ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करवून घेतली असून यासंदर्भातील व्हिडिओ तिने स्वतः सोशल मीडियावर शेअर केला आहे. अनेक वर्षांपूर्वी तिने केलेले हे इम्प्लांट आता तिला त्रासदायक ठरत असल्याचे सांगत तिने दोन्ही बाजूंचे सिलिकॉन कप्स काढून टाकले. प्रत्येक इम्प्लांटचे वजन तब्बल ८२५ ग्रॅम होते, असे तिने उघड केले.
शस्त्रक्रियेनंतर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शर्लिनने आपले सिलिकॉन इम्प्लांट दाखवून सांगितले की, छातीवरचे हे ओझे उतरल्याने तिला अक्षरशः हलके वाटत आहे. “हे जड ओझं अखेर खाली उतरलं… आता मी फुलपाखरासारखी मोकळी वाटते,” असे म्हणत तिने सोशल मीडियावर दिसणाऱ्या नकारात्मकतेला बळी न पडण्याचे आवाहन तरुणांना केले.
शर्लिनने सांगितले की, यापूर्वी तिने लिप फिलर्सही काढून टाकले होते. सौंदर्यवाढीच्या सर्जरींमध्ये दिसणाऱ्या आकर्षक परिणामांच्या मागे वास्तवात किती अडचणी आणि धोके दडलेले असतात, याबद्दल ती नेहमीच स्पष्टपणे बोलत आली आहे. फक्त बाहेरच्यांच्या मान्यतेसाठी आपल्या शरीराशी छेडछाड करू नका. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचे फायदे-तोटे समजून घ्या, तज्ज्ञ आणि कुटुंबीयांचा सल्ला घ्या आणि घाई करू नका, असा संदेश तिने दिला. शेवटी शर्लिनने तरुणांना प्रामाणिक राहण्याचा सल्ला देत सांगितले की, अनावश्यक ओझे उचलू नये आणि स्वतःची नैसर्गिक ओळख टिकवून ठेवणे हीच खरी ताकद आहे.