दिल्ली स्फोटात ‘शू बॉम्ब’चा वापर!

17 Nov 2025 14:57:17
नवी दिल्ली,
'Shoe bomb' used in Delhi blast नवी दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण स्फोटात डॉ. उमर नबीने आपल्या बुटाचा वापर करून स्फोटक सक्रिय केले असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला होता, तर २० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. जैश-ए-मोहम्मदशी संबंध असलेला आणि ‘आत्मघाती बॉम्बर’ म्हणून काम करणारा उमर नबी ‘शू बॉम्बर’ असल्याचा तपास यंत्रणेला ठोस पुरावा मिळाला आहे. आय-२० कारच्या आत सापडलेले बूट आणि त्यातील धातूचा पदार्थ हा बॉम्ब सक्रिय करण्यासाठीच वापरला गेला, असे फॉरेन्सिक तपासात निष्पन्न झाले आहे.
 

 
ड्रायव्हरच्या सीटखाली उजव्या बाजूला सापडलेल्या या बुटांवर तसेच कारच्या टायरवर संवेदनशील स्फोटक TATP चे निशाण तपासात आढळले आहेत. यातून उमरने आपल्या पादत्राणांमध्ये एक विशेष यंत्रणा बसवून स्फोट घडवला असावा, असा तपास संस्थांचा निष्कर्ष आहे. या हल्ल्याच्या मुळाशी एकट्या उमरचा हात नसून ‘फरिदाबाद मॉडेल’ नावाचा मोठा दहशतवादी गट कार्यरत होता. या मॉड्यूलमध्ये सहभागी असलेल्या डझनभर डॉक्टरांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.
 
 
हल्ल्यापूर्वी या संपूर्ण मॉड्यूलने मोठ्या प्रमाणात स्फोटक सामग्री, आर्थिक व्यवहार आणि तांत्रिक साधनांचा वापर केल्याचेही तपासात समोर येत आहे. दिल्ली पोलिस, राष्ट्रीय तपास संस्था आणि केंद्रीय गुप्तचर विभाग या तिन्ही यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या नेटवर्कचे उर्वरित सदस्य शोधण्यासाठी मोठी मोहीम सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0