वर्धा,
Wardha illegal animal trafficking जिल्ह्यातील हिंगणघाट व गिरड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन ठिकाणी कारवाई करून कत्तलीसाठी जाणार्या जनावरांची पोलिसांनी सुटका केली. १६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान पोलिसांनी ३७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नागपूर-हैदराबाद महामार्गाने जनावरांची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच हिंगणघाट येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने हिंगणघाट शहरातील कालोडे चौकात नाकेबंदी करून वाहनांची तपासणी केली. तपासणीदरम्यान एम. एच. १९ झेड. ५४२२ क्रमांकाच्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरे आढळून आली. ही जनावरे कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात नेली जात असल्याचे पुढे आल्यानंतर पोलिसांनी ट्रकसह वाहनातील २३ जनावरे जाब्यात घेतली. याप्रकरणी ट्रक चालक महेंद्र मानेश्वर (३०) रा. बोरी कला मध्यप्रदेश, वाहक गोलू कुसराम (३७) रा. मोहगाव साल्हे खुर्द मध्यप्रदेश, मोहम्मद जुबेर शेख मुमताज (३१) रा. कामठी, मोहम्मद सोहेब आलम (३३), ट्रक मालक इर्षाद उर्फ राजा अब्दुल सैयद आणि बल्लू कुरैशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत पोलिसांनी ३१.९० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
तर दुसरी कारवाई गिरड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाशी येथे करण्यात आली. वाशीकडून नंदोरीकडे जाणार्या वाहनाला थांबवून पोलिसांनी झडती केली असता त्यात जनावरे आढळून आली. वाहन चालक वैभव जांभुळे याला पोलिसांनी ताब्यात घेत विचारणा केल्यावर सदर जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचे पुढे आल्यावर पोलिसांनी वाहनातील चार जनावरे व एम. एच. ४९ डी. ११५७ क्रमांकाचे वाहन जप्त केले. या कारवाईत पोलिसांनी ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.