वर्धा,
Wardha municipal elections, जिल्ह्यातील सहा नगरपरिषदेच्या अध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज १७ नोव्हेंबर शेवटचा दिवस होता. पहिल्या सात दिवसांत अर्ज दाखल करण्यास प्रतिसाद कमी होता. शेवटच्या दिवशी सहा नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले. वर्धा नगरपरिषदेत भाजपाचे निलेश किटे, काँग्रेसकडून सुधीर पांगुळ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मुन्ना झाडे यांनी अर्ज दाखल केले. वर्धा नपत महायुती आणि मविआच्या तीन-तीन पक्षाच्या इच्छुकांनी अर्ज दाखल केलेले आहेत. उमेदवारीसाठी कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी भाजपाकडून आज सकाळपर्यंत नगराध्यक्षपदाचा उमेदवार गुलदस्त्यात होता. जिल्ह्यात अनेक ठिकाणी राजीनाराजीमध्येच आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. वर्धेत आज अध्यक्षपदाकरिता १० तर सदस्य पदाकरिता १५२ नामांकन दाखल झाले. आतापर्यंत नगराध्यक्ष पदाकरिता १५ तर सदस्यांसाठी २३५ नामांकन दाखल झालेले आहेत. वर्धेत २० प्रभागातून ४० नगरसेवक निवडून द्यायचे आहेत, हे उल्लेखनिय.
जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, देवळी आणि सिंदी रेल्वे या सहा नगरपरिषदांच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होणार आहेत. सहा नगरपालिकेत ८२ वार्डातून ६ नगराध्यक्ष आणि १६६ नगरसेवकांची निवड करायची आहे. महायुतीच्या राष्ट्रवादीतून संतोष ठाकूर, शिवसेनेकडून रविकांत बालपांडे, महाविकास आघाडी शरद पवार गटाकडून मुन्ना झाडे आणि उबाठा गटातून प्रमोद भोमले यांनी अर्ज दाखल केले. महायुती आणि महाविकास आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील की एकत्र, याबद्दल अनिश्चितता होती. आज अर्ज दाखल झाले असले तरी २१ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोण अर्ज मागे घेणार आणि कोण ठेवणार यावरच जिल्ह्यातील सहाही नगर पालिकांच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. आज रात्रीपासुन नाराजीतून अपक्ष उमेदवारी लढणार्या उमेदवारांची मनधरणी करण्याचा कार्यक्रम सुरू होईल. काही ठिकाणी दबाबतंत्राचा वापर होण्याची शयता नाकारता येत नाही.
भारतीय जनता पार्टीकडे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी अनेक उमेदवार होते. सहा नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षासाठी ६४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर सदस्यांसाठी ६०८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. शनिवारी सर्व नगरपरिषदांमधील काही सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. देवळी नगरपरिषदेत फत शोभा तडस यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला. उर्वरित पाच नगरपरिषदांच्या अध्यक्षांची नावं आज सोमवारी सकाळी जाहीर करण्यात आली. तेली प्रवर्गातील चार महिलांना तिकीट देण्यात आली. यात हिंगणघाटमधून नयना तुळसकर, आर्वीमधून स्वाती गुल्हाणे, सिंदीमधून तेजस्विनी उर्फ स्नेहल कलोडे आणि देवळीतून शोभा तडस यांचा समावेश आहे. तर वर्धेतून निलेश किटे आणि पुलगावमधून ममता बडगे या कुणबी समाजालाही प्राध्यान्य देण्यात आले. सहा नगरपंचायतींमध्ये अध्यक्षपदासाठी तिकीट मागणार्या भाजपाच्या ५८ इच्छुकांचे आणि नगरसेवक पदासाठी तिकीट मागणार्या ४४२ इच्छुकांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत.
प्रभाग आणि नगरसेवक
वर्धा जिल्ह्यात सहा नगरपालिकांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये वर्धा नगरपालिकेत २० प्रभाग : ४० नगरसेवक, हिंगणघाट येथे २० प्रभाग : ४० नगरसेवक, आर्वीत १२ प्रभाग : २५ नगरसेवक, पुलगाव १० प्रभाग : २१ नगरसेवक, देवळीत १० प्रभाग : २० नगरसेवक, सिंदी रेल्वे येथे १० प्रभागातून २० नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.
न. प. निहाय नगराध्यक्ष पदाचे आरक्षण
वर्धा : ओबीसी (सर्वसाधारण)
हिंगणघाट : खुला प्रवर्ग (महिला)
आर्वी : खुला प्रवर्ग (महिला),
पुलगाव : ओबीसी (महिला)
देवळी : खुला प्रवर्ग (सर्वसाधारण)
सिंदी (रेल्वे) : खुला प्रवर्ग (महिला)