मक्का,
Indians cremated in Saudi Arabia मक्का–मदिना महामार्गावर घडलेल्या भीषण अपघातात 45 भारतीय हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्यानंतर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या सर्व भारतीयांचे अंत्यसंस्कार सौदी अरेबियातच करण्यात येणार आहेत, आणि त्यांचे मृतदेह भारतात परत पाठवले जाणार नाहीत. या निर्णयामागील कायदेशीर कारण जाणून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. ही दुर्घटना तेव्हा घडली, जेव्हा यात्रेला निघालेली बस हायवेवर एका डिझेल टँकरला धडकली आणि काही क्षणांतच बसला आग लागली. आगीत 45 भारतीयांचा मृत्यू झाला. यापैकी 18 जण हे एकााच कुटुंबातील होते आणि या अपघातात कुटुंबातील तीन पिढ्या एका क्षणात संपुष्टात आल्या. सौदी अरेबियात हज व उमराशी संबंधित एक विशेष कायदा लागू आहे.
उमरा मंत्रालयाकडून जारी केलेल्या निर्देशांनुसार, यात्रेला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून एक डिक्लरेशन फॉर्म भरून घेतला जातो. या फॉर्ममध्ये स्पष्ट उल्लेख असतो की, यात्रेदरम्यान सौदीच्या भूमीवर त्यांचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार तेथेच केले जातील आणि मृतदेह त्यांच्या देशात पाठवला जाणार नाही. यात्रेला परवानगी मिळण्यासाठी हा फॉर्म स्वाक्षरीसह भरून देणे बंधनकारक असते. तथापि, सौदी अरेबियात नोकरीसाठी किंवा खासगी कामासाठी राहणाऱ्या परदेशी नागरिकांबाबत नियम वेगळे आहेत. अशी व्यक्ती सौदीत निधन पावल्यास त्यांच्या कुटुंबाच्या इच्छेनुसार मृतदेह मायदेशी पाठवता येतो. किंवा कुटुंब जर सौदीमध्येच राहत असेल आणि अंत्यसंस्कार तेथेच करायचे असतील तर तिथे पुरण्याची परवानगी दिली जाते.
अशा अपघातांमध्ये मृत्यू झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठीही निश्चित प्रक्रिया असते. एखाद्या यात्रेकरूचा मृत्यू झाल्यानंतर हज मंत्रालय तातडीने संबंधित देशाच्या हज मिशनला माहिती देते. त्याचबरोबर मृतांचा तपशील सौदी हज मंत्रालयाच्या वेबसाइटवरही जाहीर केला जातो. कुटुंबीयांना मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित हज कार्यालयातून मिळू शकतात. या भीषण अपघातामुळे अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण देशातून शोक व्यक्त केला जात आहे.