श्रीकांत शिंदेंना होमपिचवर मोठा धक्का; विश्वासू नेते भाजपात

18 Nov 2025 11:21:43
मुंबई,
Shock to Shrikant Shinde निवडणुकीच्या तोंडावरच कल्याण डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदेंना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या विश्वासू नेत्याने आज भाजपामध्ये प्रवेश केला असून, यामुळे शिंदे गटाला होमपिचवर धक्का बसला आहे. दिवंगत वामन म्हात्रे यांच्या चिरंजीव अनमोल म्हात्रे आणि त्यांच्या पत्नीने रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपाचे कमळ हातात घेतले. यावेळी कल्याण-डोंबिवलीतील अनेक शिवसैनिकही भाजपामध्ये सामील झाले.
 
 
श्रीकांत शिंदे
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीचे राजकीय वातावरण आता चांगलेच ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षातील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी महायुतीतील प्रमूख पक्ष भाजपा आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अनमोल म्हात्रे हे केडीएमसीमधील माजी नगरसेवक व दिवंगत वामन म्हात्रे यांचे चिरंजीव म्हणून ओळखले जातात. आज झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक स्थानिक भाजपा नेते उपस्थित होते. चव्हाण यांनी सांगितले की, दिवंगत वामन म्हात्रे यांचे आणि आपले जुने ऋणानुबंध होते आणि शहरात पारदर्शकता आणण्यासाठी भाजपाच सर्वोत्तम पर्याय आहे. त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले की सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यास हे शक्य होईल.
 
कल्याण डोंबिवली महापालिकेकडे भाजपकडून विशेष लक्ष देण्यात आले असून, ऑपरेशन लोटस अंतर्गत शिंदे गटाला मोठा धक्का देण्याचे उद्दिष्ट आहे. महापालिका निवडणुका जानेवारी २०२६च्या आधी होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक दिग्गज नेते भाजपामध्ये प्रवेश करत महापालिका निवडणुकीतील आपली जागा सुरक्षित करण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. यामुळे कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण आता चढाओढीने भरलेले दिसत आहे.
Powered By Sangraha 9.0