विमान धावपट्टीवर उतरल्या उतरल्या पेटले...video

    दिनांक :18-Nov-2025
Total Views |
कोल्वेझी,
The plane caught fire on the runway कांगोमधील कोल्वेझी विमानतळावर सोमवारी भीषण विमान अपघात घडला. धावपट्टीवर उतरतानाच विमानाचा तोल गेला आणि क्षणार्धात संपूर्ण विमानाला आग भडकली. काही क्षणातच ते आगीच्या भीषण गोळ्यात परिवर्तित झाल्याने प्रवासी आणि कर्मचारी दोघांतही गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. या विमानात कांगोचे खाणमंत्री लुईस वट्टम काबांबा यांच्यासह अनेक उच्च अधिकारी प्रवास करत होते. एरोजेट अंगोला संचालित एम्ब्रेअर ERJ-145LR हे विमान किन्शासाहून लुआलाबा प्रांतातील कोल्वेझी येथे येत होते. धावपट्टी क्रमांक २९ वर उतरतानाच विमानाचे नियंत्रण सुटले. मुख्य लँडिंग गिअर तुटल्याने विमान घसरत मागच्या बाजूने उलटले आणि त्याचवेळी मागील भागाला भीषण आग लागली.
 
 

congo plane blast 
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये कामगार आणि विमानतळ अधिकारी आग विझवण्याचा तातडीने प्रयत्न करताना दिसत आहेत. धुराचे ढग आणि आगीच्या ज्वाळांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी धडपड करताना दिसते. सुदैवाने, अग्निशमन दल आणि सुरक्षा पथकांनी काही मिनिटांतच सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.
 
 
मंत्र्यांचे सल्लागार इसहाक न्येम्बो यांनी सांगितले की अपघातात एकाही प्रवाशाला किंवा कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र विमान पूर्णपणे जळून खाक झाले असून त्याच्या अवशेषांवरूनच अपघाताचे स्वरूप समजत आहे. आग कशी लागली, लँडिंग गिअर नेमका का तुटला, धावपट्टीची स्थिती याबाबतची प्राथमिक चौकशी सुरू आहे. खाणमंत्री लुईस काबांबा कोल्वेझीजवळील कालोंडो खाणीला भेट देण्यासाठी निघाले होते. अलीकडेच तिथे मुसळधार पावसामुळे पूल कोसळून अनेक कामगारांचा मृत्यू झाला होता. याच दौर्‍यादरम्यान झालेला हा अपघात अधिकच चिंताजनक ठरला. विमान पेटूनही प्रवासी सुखरूप बचावले, हेच मोठं समाधान असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. चौकशी अहवाल येईपर्यंत विमानतळावर तातडीने सावधगिरी वाढवण्यात आली आहे.