नवी दिल्ली,
Anmol bishnois in India कुप्रसिद्ध गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई अखेर अमेरिकेतून भारतात आणण्यात आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनमोलला राजधानी दिल्लीतील आयजीआय विमानतळावर उतरवण्यात आले असून सुरक्षेच्या कडेकोट बंदोबस्तात त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील काही तासांत केंद्र सरकार त्याची प्राथमिक चौकशी कोणत्या तपास यंत्रणेकडे द्यायची याचा अंतिम निर्णय घेणार आहे.
भारतामध्ये अनमोल बिश्नोईविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि परदेशात पळून जाऊनही तो विविध गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील असल्याचे पुरावे मिळाल्याने, त्याच्याकडे भारतीय तपास यंत्रणांचे लक्ष होते. त्याच्याशी संबंधित प्रमुख तीन प्रकरणांमध्ये सिद्धू मूसेवाला हत्याकांड, राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण आणि अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार यांचा समावेश आहे. या तीन प्रकरणांच्या तपासात अनमोलची भूमिका, संपर्क, आर्थिक व्यवहार आणि गुन्हेगार टोळ्यांशी असलेल्या नात्याची विस्तृत चौकशी केली जाणार आहे.
अनमोल बिश्नोईवर एनआयएने पूर्वीच १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. २०२२ मध्ये प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर अनमोलचे नाव प्रमुख संशयितांमध्ये आले. हत्या प्रकरणाचा सूत्रधार मानल्या जाणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईशी अनमोल थेट संपर्कात असल्याचे पुरावेही समोर आले होते. एप्रिल २०२४ मध्ये मुंबईतील बांद्रा परिसरातील सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारातही अनमोल बिश्नोईच्या सहभागाची छाया दिसून आली होती. मुंबई पोलिसांनी त्याच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेला दोन अधिकृत प्रस्तावही पाठवले होते. मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, अनमोलचे ताब्यात येणे हे एक बहु-एजन्सी, समन्वयातून पार पडलेले मोठे ऑपरेशन आहे. आता मुंबई पोलिस त्याची कोठडी मागून सलग चौकशी सुरू करणार आहेत.
तसेच १२ ऑक्टोबर २०२४ रोजी बांद्रा येथे महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातही अनमोलची नोंद आहे. मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित अनेकांना अटक करण्यात आली असून अनमोलवरील संशय अधिक वाढला आहे. अमेरिकेतून थेट भारतात परत आणल्यानंतर, या सर्व प्रकरणांमधील कनेक्शन, कटकारस्थानातील भूमिका, परदेशातील गँग ऑपरेशन आणि निधीपुरवठ्याबाबत तपशीलवार पडताळणी केली जाणार आहे. अनमोलच्या परतण्यामुळे या संवेदनशील गुन्ह्यांच्या चौकशीला नवी गती मिळण्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत.