तभा वृत्तसेवा
दिग्रस,
Municipal Council Elections : नगर परिषद निवडणुकांसाठी नामांकन प्रक्रियेला उमेदवार, कार्यकर्ते व नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून संपूर्ण शहराचे लक्ष आता ‘अध्यक्षपदाच्या तिरंगी लढती’कडे लागले आहे. 17 नोव्हेंबर रोजी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 183 अर्ज दाखल झाले. त्यात अध्यक्षपदासाठी 13 व नगरसेवक पदासाठी तब्बल 170 अर्जांचा समावेश आहे. मंगळवार, 18 नोव्हेंबरला झालेल्या छानणीत अध्यक्षपदासाठी दाखल केलेल्या 13 अर्जांपैकी 5 उमेदवार अपात्र ठरले असून शुक्रवार, 21 नोव्हेंबरला माघार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
शेवटच्या क्षणी भाजपा-शिवसेना युती फिसकटल्याने लढतीतील रोमहर्षकता आणखी वाढली आहे. नप अध्यक्षाप्रमाणे जवळपास 8 प्रभागात तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत, दिग्रसने अनेक निवडणुका पाहिल्या, पण यंदाची अध्यक्षपदाची तिहेरी चुरस, गोंधळलेले गणित आणि प्रतिष्ठेची लढत अशा सर्वांचा मिलाफ असलेली ठरत आहे.
दरम्यान, नगरसेवक पदासाठी झालेल्या उमेदवारी अर्ज छाननीत 161 पैकी 47 उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरल्याने नगरसेवक पदासाठी 12 प्रभागातील 25 जागेसाठी 114 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून भाजपा, शिवसेना, शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष उमेदवारांचा मोठा समुदाय निवडणूक रिंगणात कायम असून त्यांचे स्पष्ट चित्र नामांकन अर्ज मागे घेतल्यानंतर होणार आहे.
प्रभाग क्रमांक 2 (ब) सर्वसाधारण जागेवर शिवसेना (उबाठा)तर्फे माजी नप अध्यक्ष रवींद्र अरगडे व विक्रम अटल यांच्यासह भाजपाच्या 1 उमेदवाराचा उमेदवारी दाखल अर्ज छाननी प्रक्रियेत या तिन्ही उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरल्याने निवडणूक रंगत गाठण्याआधीच अनपेक्षित कलाटणी मिळाली आहे. विशेष म्हणजे, अनेक निवडणुका लढविण्याचा दांडगा अनुभव असलेल्या माजी अध्यक्ष रवींद्र अरगडे यांचा अर्ज अपात्र ठरल्याने शहरात चर्चांचे वादळ अक्षरशः घोंगावत आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक 5 मधील सर्वसाधारण जागेसाठी भाजपाच्या महिला उमेदवाराचा अर्जही अपात्र ठरल्याने स्थानिक राजकारणात प्रचंड गोंधळ निर्माण झाला असून, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता व तर्क-वितर्कांना चांगलाच ऊत आला आहे. येथील राजकीय पतंगबाजीत या निर्णयांमुळे नव्या समीकरणांच्या चर्चा जोर धरलेला दिसत आहेत.