पुणे,
Cold wave in Marathwada and Vidarbha महाराष्ट्रात थंडीची लाट आता जोर धरत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान एक अंकी आकड्यावर पोहोचल्याचे नोंदले गेले आहे, ज्यामुळे नागरिकांना कडाक्याची थंडी जाणवत आहे. पुण्यात तीन वर्षांनी विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. पुणे शहराचे किमान तापमान सरासरी 9.4 अंश सेल्सिअसवर पोहचले असून, मागील काही दिवसांपासून ते 10 अंश सेल्सिअसच्या आसपास होते. राज्यभरात पसरलेली ही थंडी नागरिकांसाठी चिंता वाढवणारी असून, हवामान खात्याचे अंदाजानुसार हिवाळ्यातील थंडीचे आणखी दिवस सुरू राहतील. पुणे, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लोणी काळभोर येथे सर्वात नीचांकी तापमान 6.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. हवामान खात्याचे अंदाजानुसार आगामी दोन ते तीन दिवसांत तापमानात काही फरक असला तरी थंडी कायम राहणार आहे. कोकणातही थंडीचा जोर वाढला असून, दापोली येथे तापमान 8 अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. या वर्षी दापोलीत हिवाळ्यातील सर्वात नीचांकी तापमान नोंदवले गेले आहे. कोकणातील ‘महाबळेश्वर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीत सकाळी अत्यंत गारवा जाणवतो, तर सिंधुदुर्गात 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दापोलीत किमान–कमाल तापमानात तब्बल 22 अंशांची तफावत असल्याचे निरीक्षण केले गेले आहे. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातही थंडीचा जोर आहे. परभणी शहरात यंदाच्या मोसमातील सर्वात नीचांकी तापमान 7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, मागील आठवडाभर तापमान सातत्याने दहा अंशाखाली राहिले आहे. दिवसभर हवामान थंड असल्यामुळे नागरिकांना अक्षरशः हुडहुडी भरते. ग्रामीण भागासह शहरात शेकोट्यांचा वापर सुरु आहे, तर उबदार कपड्यांचा वापरही केला जात आहे.
गोंदिया जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून थंडीची तीव्र लाट जाणवते. तापमानात अचानक घट झाल्यामुळे नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. देवरी शहरासह परिसरात सकाळच्या सुमारास दाट धुके पसरले होते, ज्यामुळे रस्त्यावर काही मीटर अंतरावर असलेले व्यक्ती किंवा वाहन स्पष्ट दिसत नव्हते. नगरपंचायत मैदानात मॉर्निंगसाठी आलेल्या नागरिकांना गुलाबी थंडी आणि दात धुके यांचा अद्भुत अनुभव मिळाला.