आठ रेती तस्कारांना न्यायालयाचा दणका

19 Nov 2025 18:56:46
गोंदिया,
sand smugglers अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतूक, ग्रामस्थांना शस्त्राच्या धाकावर धमकाविणे व मारहाण करणे आदीसाठी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या ८ आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. ए. एस. प्रतिनिधी यांनी १८ नोव्हेंबर रोजी १० वर्षाचा सश्रम कालावधी तसेच प्रत्येकी १५ लाख रूपयांचा दंड ठोठावला. विशेष म्हणजे, यातील एका आरोपीचा मृत्यू झाल्याने त्याच्याविरोधातील कारवाई थांबविण्यात आली.
 
 

sandsmuggler  
 
 
रोहीत उर्फ गोलू तिवारी असे मृत आरोपीचे नाव आहे. तर जुल्फिकार उर्फ छोटू जब्बार गणी (३६), इमरान उर्फ महफूल खान (३०), शाहबाज उर्फ बंदे शब्बीर पठाण (२६), सलमान इस्माईल खान (२८), दुर्गेश लक्ष्मण विठ्ठले (२३), राहूल सुनील नेवारे (२८), प्रकाश उर्फ अप्पू ओमकार बाजपेई (३०), रोहित उर्फ पिंटू भरतलाल भेलावी (३१) अशी आरोपींची नावे आहे. गोंदिया तालुक्यातील मरारटोला (तेढवा) येथे ९ सप्टेंबर २०१६ रोजी रात्री १० वाजता गणेशोत्सव मंडळाच्याजवळ कबड्डी स्पर्धा सुरू होत्या. यावेळी येथून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर व ट्रॉलीमुळे कबड्डी खेळणार्‍यांना अडथळा निर्माण झाला. ग्रामस्थांनी ट्रॅक्टर थांबविला असता चालकाने भ्रमणध्वनीवरून याची माहिती रेती तस्करांना दिली. त्यानंतर काही वेळातच एका स्कार्पिओ व दुचाकीने आरोपी घटनास्थळी पोहोचले व त्यातील एकाने शिवलाल जगलाल मातरे याच्या डोक्यावर पिस्टल ठेवून ग्रामस्थांना धमकावले, तर इतर आरोपींनी पाच ते सहा जणांना घातक शस्त्रांनी मारहाण करून गंभीर जखमी झाली. प्रसंगी ग्रामस्थांनी धाव घेतली असता आरोपींनी वाहन व शस्त्रे टाकून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच रावणवाडी पोलिसांनी घटनास्थळ पोहचले व घटनास्थळावरून ट्रॅक्टर, ट्रॉली, स्कार्पिओ वाहन, दुचाकी, पिस्टल, सहा जीवंत काडतूस, २ तलवार, १ लोखंडी रॉड असा १३ लाख ९०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आरोपींवर विविध कलमे व मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केले. दरम्यान याप्रकरणी तपासाअंती आरोविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.sand smugglers याप्रकरणी न्यायालयात, घटनास्थळावरून जप्त केलेले शस्त्रे व वाहने, आरोपींचे कॉल रेकॉर्ड आणि ३१ नागरिकांचे बयाणातून आरोपींचा गुन्हा सिद्ध झाल्याने न्या. प्रतिनिधी यांनी आरोपींना १० वर्षाचा सश्रम कारावास, प्रत्येकी १५ लाख रूपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्याचा कारावासाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. वसंत चुटे व अ‍ॅड. क्रिष्णा पारधी यांनी बाजू मांडली. तर आरोपी पक्षातर्फे अ‍ॅड. प्रकाश तोलानी, अ‍ॅड. परवेज शेख व अ‍ॅड. व्ही. एन. बारापात्रे यांनी बाजू मांडली. आरोपींपैकी गणी खान याला अकोला कारागृहात तर अन्य आरोपींना भंडारा कारागृहात रवाना करण्यात आले आहे.
न्यायालयाची नोंद...
न्यायालयाने म्हटले की, ही घटना केवळ हल्ला नसून संघटित, सुनियोजित अपराध आहे. रेती तस्करांचा हा समूह कायद्याला आव्हान देणारे संघटित तंत्र बनले होते. अशा आरोपींना कठोर दंडाद्वारे थांबणे गरजेचे होते.
Powered By Sangraha 9.0