नांदगाव पेठ,
love jihad case नांदगाव पेठ परिसरातील लव्ह जिहाद प्रकरणाने सोमवारी प्रचंड नाट्यमय वळण घेतले. एका विवाहित महिलेला मुस्लिम युवकाने फूस लावून पळविल्याची तक्रार पतीने केल्यानंतर गावात तणाव निर्माण झाल्यावर भाजपा कार्यकर्ते, विविध हिंदुत्ववादी संघटना आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र येत पोलिस ठाण्यावर जमाव धडकला होता.
शेवटी अमरावतीतील ताज नगर परिसरातून महिला आणि तिच्या प्रियकराला सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले. मात्र पोलिस स्टेशनमध्ये आणल्यानंतर परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली. कुटुंबीय, पती, गावकरी आणि महिलेसमोर उपस्थित असलेल्या नेत्यांनी समजूत घातल्यावरही ती महिला प्रियकरासोबत जाण्यावर ठाम राहिली. तिच्या या भूमिकेमुळे कुटुंबीय पूर्णपणे कोलमडले; गावकर्यांतही संतापाचे वातावरण निर्माण झाले. परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. लोकांच्या वाढत्या जमावामुळे परिस्थिती तणावपूर्ण असूनही पोलिसांनी स्थिती नियंत्रणात ठेवली. घटनास्थळी खा. अनिल बोंडे, आ. राजेश वानखडे, विवेक गुल्हाने, प्रा. मोरेश्वर इंगळे, राजू चिरडे यांच्यासह असंख्य भाजप नेते आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. नेत्यांनी पोलिसांना कठोर कारवाईची मागणी करत पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची हमी दिली.
आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
दरम्यान, अचानक समोर आलेल्या एका धक्कादायक तक्रारीने संपूर्ण प्रकरणाने मोठी कलाटणी घेतली. संबंधित महिलेच्या नणंदेने पोलिसांकडे त्या युवकाविरोधात तक्रार दाखल करत सांगितले की, सप्टेंबर महिन्यात घराचे बांधकाम सुरू असताना हा मुस्लिम युवक मजूर म्हणून तेथे काम करत होता. त्याच काळात त्याने तिच्या तीन वर्षांच्या लहान भाचीशी अश्लील वर्तन केले होते. बदनामीच्या भीतीने तेव्हा तक्रार केली नव्हती, मात्र आता सर्व गोष्टी उघड करण्याचा तीने निर्णय घेतल्याचे सांगितले. या फिर्यादीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पोक्सो कायद्यांतर्गत तौसीब अली शौकत अली रा. उपराई याच्यावर गंभीर गुन्हा नोंदवला. याशिवाय या गुन्ह्यातील साथीदार म्हणून संबंधित महिलेलाही आरोपी करण्यात आले. दोघांचीही वैद्यकीय चाचणी केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत पोलिस कोठडीत व तेथून तुरुंगात रवाना करण्यात आले. पुढील तपास नांदगाव पेठ पोलिस करत आहे. समाजात धार्मिक तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी सतर्कता वाढवली असून पुढील चौकशी अत्यंत संवेदनशील पद्धतीने सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
कायदा हातात घेऊ नये : दिनेश दहातोंडे
नांदगाव पेठमधील वादग्रस्त प्रकरणात संबंधित महिला व त्या युवकाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला गती देण्यात आली आहे.love jihad case परिसरात परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, तसेच कायदा हातात घेऊ नये. असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांनी केले.