जिल्ह्यात नामांकनाच्या शेवटच्या दिवशी उडाली ‘झुंबड’

19 Nov 2025 14:38:45
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
General Election : जिल्हातील 10 नगरपरिषदा व एक नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी सोमवार, 17 नोव्हेंबर रोजी नामांकन दाखल करण्याची शेवटचा दिवस असल्याने नामांकन दाखल करण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाली.
 
 

ytl 
 
 
 
जिल्ह्यातील यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड, आर्णी, घाटंजी, पांढरकवडा, वणी व नेर या पालिका तर ढाणकी नगरपंचायत निवडणूक होऊ घातली आहे. निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास 10 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबरपर्यंत होती. रविवार, 16 नोव्हेंबरला जिल्ह्यात एकूण 674 नामांकन दाखल झाले.
 
 
यात अध्यक्षपदासाठी 40 तर सदस्यांसाठी 634 नामांकन दाखल करण्यात आले होते. यवतमाळ नगर परिषद अध्यक्षपदासाठी माधुरी मडावी, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या तेजस्विनी चांदेकर, भाजपाकडून अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके, काँग्रेसकडून सेवानिवृत्त मुख्याध्यापक छाया रामचंद्र सुरपाम (पट्टे), प्रियंका मोघे यांनी नामांकन दाखल केला आहे.
 
 
उमरखेड नगर परिषद अध्यक्षपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, उबाठा, विदर्भ विकास आघाडीची संयुक्त उमरखेड जनशक्ती पॅनेल या नावाने असलेल्या आघाडीकडून तेजश्री संतोष जैन यांनी नगर परिषद अध्यक्षसाठी अर्ज दाखल केला. तर भाजपाकडून निधी भुतडा, भावना उदावंत यांनी नामांकन दाखल केले आहे.
 
 
नगर परिषद अध्यक्ष व सदस्यांसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामांकनाची छाननी 18 नोंव्हेबर रोजी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाèयांच्या निर्णयाविरुद्ध अपिल नसलेल्या ठिकाणी 21 तर अपिल असलेल्या ठिकाणी 25 नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येणार आहे. मतदान 2 डिसेंबरला होणार असून मतमोजणी सर्व संबंधित ठिकाणी 3 डिसेंबरला होणार आहे.
मडावी यांच्या नामांकनाविरुद्ध आक्षेप
 
 
नगर परिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी काँग्रेस पक्षाच्यावतीने नगर परिषद अध्यक्षपदासाठी नामांकन दाखल केले होते. मात्र, त्यांच्या नामांकनाविरुद्ध गजानन भडके यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्या आक्षेपानुसार यवतमाळ नगर परिषदेच्या मतदार यादीत नाव नसताना गडचिरोली नगर परिषदेच्या मतदार यादीतील नाव जाणीवपूर्वक लपवून निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचे म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0