शासन मूल्यांकनात अमरावती विद्यापीठाला तृतीयस्थान

19 Nov 2025 21:53:51
अमरावती, 
amravati-university : महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र व शिक्षण विभागाने सेवाशर्ती कार्यक्रमांतर्गत शासकीय अकृषी विद्यापीठांमध्ये राबविलेल्या मूल्यांकनात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला ६२ गुणांसह तृतीय स्थान मिळाले आहे. या यशाबद्दल विद्यापीठाच्या आस्थापना विभागातील कर्मचार्‍यांचा कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी सत्कार केला.
 

AMT 
 
 
 
अतिशय कमी मनुष्यबळातही आपल्याला हे यश प्राप्त करता आले, हे अतिशय अभिमानास्पद असून करण्यात आलेल्या मूल्यांकनात आपले विद्यापीठ राज्यात तृतीय स्थान प्राप्त करु शकले, ते आस्थापना विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यामुळेच शक्य झाले आहे, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. बारहाते यांनी याप्रसंगी काढले. या मूल्यांकनात गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली विद्यापीठाने ६८ गुणांकनासह प्रथम स्थान, तर मुंबई विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी ६६ गुणांसह व्दितीय स्थान पटकाविले आहे.
 
 
उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील तेरा सार्वजनिक अकृषी विद्यापीठांच्या कामकाजाची तपासणी केली. या उपक्रमात विभागाने विविध निकषांच्या आधारे विद्यापीठांच्या कामगिरीचे मूल्यांकन केले. या उपक्रमासाठी विद्यापीठाकडून कोणतेही अर्ज किंवा माहिती मागविल्या गेली नाही. सरकारकडे सादर केलेल्या माहितीच्या आधारे सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रातील कामकाजाचे एका कंपनीची मदत घेवून सदर मूल्यमापन केले गेले. यशाबद्दल कुलगुरू डॉ. बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. ढोरे, कुलसचिव असनारे यांनी आस्थापना विभागाचे उपकुलसचिव मंगेश वरखेडे, सहा. कुलसचिव अनिल मेश्राम, अधीक्षक अमोल म्हैसाळकर, वरिष्ठ सहाय्यक अजय देशमुख, डॉ. श्रीकांत तायडे, जगदीश देशपांडे, नरेंद्र खैरे, प्रदीप चिमोटे, प्रशांत देशमुख, आदिती मोहोड, अनंत पाटील, आशीष माहोरे, राम पासरे, संदीप ताथोडे, साहील क्षीरसागर, चंद्रकांत धंदर, दिनेश मारोडकर, रामेश्वर सोळंके, बिहारीलाल जयस्वाल, वंदना गुरनुले आदी कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले आहे.
Powered By Sangraha 9.0