‘नायलॉन मांजा’मुळे एकजण जखमी

19 Nov 2025 20:07:18
तभा वृत्तसेवा
बोरी (चंद्रशेखर), 
Nylon Manja : बोरी कृषक सहकारी सोसायटीचे कर्मचारी वैभव गुल्हाने हे दररोजप्रमाणे रात्री आपले कर्तव्य आटोपून दहीफळकडे मोटरसायकलने जायला निघाले होते. रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर अंधार होता. ते बोरी पुलावर पोहोचताच त्यांच्या गळ्याला अचानक तीव्र, धारदार धक्का बसला. काही क्षणातच त्यांना मानेभोवती मांजाचा धागा अडकल्याचे लक्षात आले. अगदी केसाएवढा बारीक आणि काचाची चुरी लावलेल्या तो किलर मांजा त्वचेला चिरत त्यांच्या तोंडापर्यंत पोहोचला.
 
 
 
y19Nov-Vaibhav-Gulhane
 
 
 
अचानक झालेल्या या आघाताने वैभव यांचा तोल गेला आणि ते मोटरसायकलसह रस्त्यावर कोसळले. या धडकेत त्यांना अनेक ठिकाणी जखमा झाल्या. गंभीर रक्तस्त्राव झाल्याने ते तेथेच बेशुद्धावस्थेत पडून राहिले. काही वेळाने रस्त्यावरून जाणाèया एका तरुणाने त्यांना पाहिले आणि तातडीने मदत केली. स्थानिकांनी वैभव यांना तत्काळ उपचारार्थ दारव्हा येथील रुग्णालयात हलवले.
किलर मांजा ठरतोय जीवघेणा..
 
 
दरवर्षी मकरसंक्रांतीच्या काळात आणि त्यानंतरही काचेचा लेप लावलेला घातक मांजा जीवघेणा ठरतो. पक्षी, पादचारी, दुचाकीस्वार मृत्यू अथवा गंभीर जखमा होण्याची संख्या वाढली आहे. बोरी परिसरात गेल्या काही वर्षांत अशा अनेक घटना घडल्या आहेत. राज्यात नायलॉन मांजा, काचेचा मांजा, चिनी मांजावर बंदी असतानाही तो खुलेआम विकला जातो. मुले आणि तरुणांच्या हातात तो सहज उपलब्ध असल्याने त्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे या मांजाच्या विक्री व वापरावर त्वरित बंदी आणावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
Powered By Sangraha 9.0