बुलढाणा,
local-government-general-election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक चा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील ११ नगरपालिकांमध्ये उमेदवार खर्च समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समित्यांच्या कार्यात सुसूत्रता, पारदर्शकता आणि नियमबद्धता आणण्यासाठी दि. १९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात मार्गदर्शनपर सभेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा जिल्हा खर्च देखरेख समिती सदस्य सचिव प्रकाश राठोड यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार उमेदवार खर्च समित्यांनी अनुसरावयाच्या कार्यपद्धती, निकष व जबाबदार्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणामध्ये उमेदवारांनी केलेल्या दैनंदिन खर्चाची नोंद, पडताळणी आणि ताळमेळ कसा ठेवायचा याची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली. खर्चासंबंधी सर्व पुरावे, पावत्या व दस्तऐवज नियमानुसार सुरक्षित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. सर्व उमेदवारांनी खर्च मर्यादेचे काटेकोर पालन करावे यासाठी खर्च समित्यांनी कोणती दक्षता घेणे आवश्यक आहे, यावर मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शन सभेला जिल्ह्यातील ११ नगरपालिकांमधील तसेच उपकोषागार आणि पंचायत समित्यांमधील लेखा अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खर्च ताळमेळ व संबंधित प्रक्रियेबाबत उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचे निरसनही यावेळी करण्यात आले.