मालेगाव,
Malegaon rape-murder : मालेगाव तालुक्यातील एका गावात रविवारी रात्री तीन वर्षांची चिमुरडी खेळता खेळता बेपत्ता झाली. तीन तासांच्या आतच तिचा मृतदेह जवळच्या मोबाईल टॉवरजवळील झुडपात सापडला. पोलिसांनी मुलीसोबत खेळणाऱ्या इतर मुलांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका बांधकाम मजुरावर संशय दाखवून त्याला अटक केली असून, २० नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांच्या तपासानुसार आरोपीने मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून पळवून नेले, तिच्यावर अत्याचार करून हत्या केली आणि मृतदेह झुडपात फेकला. मुलीचे आई-वडील घरात असताना ती अंगणात खेळत होती. बराच वेळ परत न आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी संशयिताची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पीडित कुटुंबीयांनी आरोपीला कठोर शिक्षा देऊन इतरांसाठी धडा ठरण्याची मागणी केली आहे.
सौजन्य: सोशल मीडिया
चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया
"मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या चिमुकलीवर घडलेली क्रूर घटना मन सुन्न करणारी आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात त्या नराधमाला अटक करून तत्परता दाखवली आहे. अशा विकृत आणि अमानुष कृत्याला महाराष्ट्रात कधीच जागा नाही. पीडित कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठाम उभे आहोत. सरकारकडून जलद चौकशी, सक्षम सरकारी वकील आणि फास्ट-ट्रॅक न्यायप्रक्रियेची तातडीने व्यवस्था करण्यात येईल. त्या चिमुकलीला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही."