हिंगणघाट,
mayors-post-in-hinganghat : स्थानिक नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी १२ उमेदवार तर नगरसेवक पदासाठी २३५ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले. येथील पालिकेत नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव असून यात १२ महिलांनी आपले १३ उमेदवारी नामांकन दाखल केले होते. त्यातील एकही अर्ज छाननी प्रक्रियेत अवैध न ठरल्याने नगराध्यक्ष पदासाठी १२ उमेदवार सध्या रिंगणात आहेत.
हिंगणघाटमध्ये २० प्रभागातील ४० जागांसाठी २४८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. यात पुरुषांच्या २० जागांसाठी १३३ तर महिलांच्या २० जागांसाठी ११५ उमेदवारी अर्ज आले होते. १८ रोजी झालेल्या छाननी प्रक्रियेत ८ पुरुषांचे तर ५ महिलांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने आता पुरुषांच्या नगरसेवकपदाच्या २० जागांसाठी १२५ तर महिलांच्या नगरसेवकपदाच्या २० जागांसाठी ११० उमेदवारी अर्ज वैध ठरल्याने ४० जागांसाठी २३५ उमेदवार रिंगणात आहेत.
प्रमुख राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांच्या आघाडी व युतीचा विचार करता भाजपा व रिपाई आठवले गट यांच्यात युती होऊन ४० नगरसेवक पदांपैकी भाजपा ३७ व रिपाई आठवले गट तीन जागांवर लढणार आहे. इतर कोणत्याही पक्षाची आघाडी होऊ शकलेली नाही. काँग्रेसने त्यांचे ४० नगरसेवकांच्या जागांसाठी केवळ १३ उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. यात ८ पुरुष व ५ महिला उमेदवारांचा समावेश आहे. भाजपाच्या उमेदवारांत २० पुरुष व १९ महिलांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सगळ्याच ४० नगरसेवकपदांच्या जागेवर आपले उमेदवार उभे केलेले आहेत. शरद पवार गटाने ३९ उमेदवार दिले असून त्यात २० पुरुष व १९ महिलांचा समावेश आहे. एका ठिकाणी त्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. शिवसेना उबाठा गटाने ४० पैकी ३७ उमेदवार मैदानात उतरविले आहे. तर शिवसेना शिंदे गटाच्या २२ उमेदवारांमध्ये १५ पुरुष व ७ महिला उमेदवारांचा समावेश आहे.