६ एकर कापसावर फिरविला रोटावेटर

19 Nov 2025 15:00:06
समुद्रपूर
farmer यंदाच्या खरीपात अतिवृष्टी, किडींचा प्रादुर्भाव या कारणांची झळ शेतकर्‍यांना सहन करावी लागली. सोयाबीनचे नुकसान पचवत असतानाच कापूस तरी साथ देईल, या आशेवर उभा असलेला करूळ येथील शेतकरी मल्लार साबळे अखेर पूर्णपणे हताश झाले. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आणि लाल्या रोगाच्या तिव्रतेमुळे त्यांनी ६ एकर कापसाचे पीक रोटावेटरने काढून पीक जमिनदोस्त केले.
 
 

farmer  
 
 
सुरूवातीला कापूस चांगल्या वाढीस होता. दिवाळीपूर्वी कापसाची काढणी सुरू होईल, काही उत्पन्न मिळेल, असे मल्लार यांना वाटत होते. पण, पावसाचा जोर ओसरल्यानंतर काही दिवसातच बोंडअळीने शेत व्यापले. बोंडात अळी शिरल्याने वाढती बोंडं आतूनच खराब होऊ लागली. त्यात लाल्या रोगाची भर पडताच पानगळ, कोमेजणे, आणि झाडे निर्जीव होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली. औषधांच्या फवारण्या करूनही किडीचा वेग थांबेना. खर्च वाढत गेला, मात्र पीक वाचण्याची शक्यता क्षीण होत गेली. काही दिवस वाट पाहू, असा सल्ला काही शेतकर्‍यांनी दिला. परंतु, शेताची एकूण स्थिती पाहून शेतकरी मल्लार यांना निर्णय घ्यावा लागला. स्वतः उभे केलेले पीक स्वत:च्या हाताने नष्ट करणे ही किती कठीण वेळ असते, याचा अनुभव त्यांनी घेतला. शेवटी त्यांनी पीक नांगरून टाकले.farmer  रोटावेटरचा आवाज शेतभर घुमत होता, पण त्याचवेळी त्यांच्या मनातील अपेक्षांची नांगरणीही होत होती. कापसाच्या प्रत्येक ओळीत त्यांच्या मेहनतीचा घाम होता; आणि तोच काही क्षणांत मातीमोल झाला.
या नांगरणीमुळे मल्लार यांचे जवळपास ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कर्ज, घरखर्च, हंगामी गरजा सर्वच जबाबदार्‍या आता अधिकच वाढल्या आहेत. परिसरातील इतर शेतकर्‍यांनाही याचप्रकारे बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे मोठा फटका बसला आहे. कापूस उत्पादन घटण्याची भीती वाढली असून शासनाने तातडीने सर्वेक्षण करून नुकसानभरपाईचे उपाय करावे, अशी मागणी होत आहे.
Powered By Sangraha 9.0