दर्यापूर,
daryapur-accident : शिकवणीला जाण्यासाठी निघालेल्या शाळकरी विद्यार्थांने दुचाकीचे अचानक ब्रेक दाबल्याने मागील सीटवर बसलेला दुसरा विद्यार्थी अचानक समोरून येणार्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन अपघात झाला. त्यात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी रस्त्यावर अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता.

बुधवार सकाळी ८ वाजता दर्यापूर एसटी आगार समोर हा भीषण अपघात झाला. या अपघातात १४ वर्षीय विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दर्यापूर ते मुर्तीजापूर रोड टी-पॉईंटवरील एसटी डेपो समोर मोटरसायकल क्रमांक एमएच ३० एडी ४९१७ आणि ४०७ ट्रक एमएच २७ एक्स १३०८ यांच्यात झालेल्या अपघातात शाळकरी विद्यार्थी शिवराज प्रतीक राळे (वय १४ वर्षे, रा. सोनखेड) याचा जागीच मृत्यू झाला. शिवराज राळे हा पंजाबराव कॉलनी येथे आपल्या कुटुंबासह भाड्याने राहत होता. शिवराज आणि त्याचा मित्र शिवम नवलकर ट्युशनसाठी जात असताना ट्राफिकमुळे मोटरसायकलचा अचानक ब्रेक दाबल्याने वाहनाचे नियंत्रण सुटले आणि मागील सीटवर बसलेला शिवराज थेट ४०७ ट्रकच्या मागील चाकाखाली गेल्याची माहिती आहे. अपघात इतका भीषण होता की शिवराजचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी रुग्णसेवक गोपाल अरबट हे आपले रुग्णवाहिका घेऊन दाखल झाले. त्यांनी शिवराजला रुग्णवाहिकेमध्ये टाकून उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे आणले. शिवराज हा एकविरा शाळेत वर्ग दहावीमध्ये शिक्षण घेत होता. सदर ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.