आनंदवार्ता...शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले २ हजार!

19 Nov 2025 15:20:02
नवी दिल्ली,
Tapradhan Kisan Samman Nidhi Yojana पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिला जाणारा २१ वा हप्ता अखेर जाहीर करण्यात आला असून देशभरातील ९ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २,००० रुपये जमा झाले आहेत. खास किसान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील कोइम्बतूर येथून या हप्त्याचे वितरण केले. दिवाळीपासून या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी ही मोठी आनंदवार्ता ठरली आहे.
 
 

PM Kisan Yojana 
गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये २१ वा हप्ता दिवाळीपूर्वी मिळू शकतो, अशी चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात तसे न होता, १९ नोव्हेंबर रोजी किसान दिनाच्या निमित्तानेच हप्ता जारी करण्यात आला. पंतप्रधान मोदींनी एका क्लिकवर १८,००० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले असून, लाभार्थ्यांची संख्या ९ कोटींच्या पुढे गेली आहे. हप्ता जमा झाला आहे का हे जाणून घेण्यासाठी शेतकरी ‘पीएम किसान पोर्टल’वर जाऊन त्यांची नोंद तपासू शकतात. जर नोंदणी किंवा लाभात कोणतीही अडचण येत असेल, तर शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणे, बँक खाते आधारशी लिंक करणे यांसारखी आवश्यक प्रक्रिया अद्ययावत करणे गरजेचे आहे. त्यानंतरही लाभ मिळत नसेल तर पीएम किसान हेल्पलाइन १८००-१८०-१५५१ किंवा नजीकच्या सीएससी केंद्राशी संपर्क साधता येईल.
 
पीएम किसान योजनेबाबत अनेक शंकाही शेतकरी विचारत असतात. कर भरल्यास योजनेचा लाभ मिळू शकतो का, या प्रश्नावर सरकारने स्पष्ट केलं आहे की जुन्या किंवा नवीन कोणत्याही करप्रणालीत कर भरला तरी अशी व्यक्ती या योजनेची पात्र ठरत नाही. भूमिहीन शेतकऱ्यांच्या बाबतीतसुद्धा नियम स्पष्ट आहेत. ही योजना केवळ जमीन असलेल्या शेतकऱ्यांपुरतीच मर्यादित असून भूमिहीन श्रमिकांना त्याचा लाभ मिळत नाही. संयुक्त कुटुंबातील सदस्यांबाबत लागू असलेल्या अटींनुसार प्रत्येक कुटुंबात फक्त एकालाच लाभ दिला जातो. मात्र दोन भावांची कुटुंबे वेगळी असल्यास ते स्वतंत्रपणे योजनेचा लाभ घेऊ शकतात. किसान दिनी मिळालेला हा आर्थिक आधार रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरला आहे. केंद्र सरकारच्या या उपक्रमामुळे शेतकरी वर्गाच्या हातात थेट आर्थिक मदत पोहोचत असल्याने या योजनेची पोहोच आणि परिणामकारकता मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे.
Powered By Sangraha 9.0