वर्धा,
wardha girls volleyball महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेच्या वतीने आयोजित १३ ते १६ नोव्हेंबर दरम्यान ईश्वरपूर जिल्हा सांगली येथे संपन्न झालेल्या वरिष्ठ गट आंतर जिल्हा राज्यस्तरीय व्हॉलिबॉल अजिंयपद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून मुलींचे २० व मुलांचे ३२ संघ सहभागी झाले होते. चार दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये वर्धा जिल्ह्याच्या दोन्ही संघांनी सहभाग घेत मुलींनी साखळी सामन्यामध्ये चंद्रपूर व अहल्यानगर या दोन संघांवर एकतर्फी मात करून सुपर ८ मध्ये प्रवेश मिळवला होता.
उपांत्य पूर्व सामना सुद्धा वर्धा जिल्ह्याच्या महिला संघाने मुंबई शहर या संघासोबत जिंकला आणि सरळ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला. उपांत्य सामन्यांमध्ये पुणे या बलाढ्य संघाकडून पराभव जरी पत्करावा लागला, परंतु तिसर्या बक्षिसासाठी कोल्हापूर या संघासोबत ३-० अशा सेटच्या फरकाने विजय मिळविला. संपूर्ण स्पर्धेच्या रौप्य पदकावर आपले नाव निश्चित केले. व्हॉलिबॉलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असे यश वर्धा जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. यापूर्वी कधीही सीनियर गटामध्ये पहिले, दुसरे किंवा तिसरे असे कोणतेही पदक जिल्ह्यातील मुलं किंवा मुलींना प्राप्त करता आले नाही. परंतु, वर्धा जिल्ह्यातील खेळाडूंच्या कौशल्यपूर्ण खेळामुळे आज हे शय झाले आहे. मुलांच्या संघाने सुद्धा साखळी सामन्यातून पूल टॉप करीत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश मिळविला होता.wardha girls volleyball महिला व्हॉलिबॉल संघाचे नेतृत्व रक्षा खेनवर हिने केले तर कांचन रघाटाटे, दीक्षा भुजाडे, अश्वती शास्त्रकार, संतोषी कैकडी, नव्या चेर, भूमी रिठे, स्वरा राजूरकर, धनश्री भुजाडे, स्वरा चिखले, केतकी कदमदड, स्मिता बनसोड या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. संघाचे मुख्य प्रशिक्षक नितेश अनमूलवार, सहाय्यक प्रशिक्षक, मीनल वहाने, संघ व्यवस्थापक सचिन पंचभाई यांनी खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले. या यशाबद्दल वर्धा जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेचे सचिव तथा महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेचे कोषाध्यक्ष सुनील साकळे, भीमराव ढोक, किशोर पोफळी, सुरेंद्र गांडोळे, अॅड. श्रीजित जोशी, प्रा. नितीन घोडे, हर्षल थूल, अशोक वेळेकर, गोपाल सोनी, सूरज दवाळे, विकास काळे, तुषार आंबेकर, अनिल कावळे, आदी क्रीडा प्रेमींनी रेल्वे स्थानकावर प्राविण्यप्राप्त खेळाडूंचे जल्लोषात स्वागत केले.