थेंबांची खबरदारी, तरुणांची जबाबदारी

19 Nov 2025 20:09:28
नागपूर, 
Painting Workshop : ‘पाणी आणि नदी’ हे जीवनाची शाश्वत मुळे असून याच्या प्रत्येक थेंबाचा खबरदारीने वापर करण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीची आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ जलअभ्यासक आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर भूविज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ. योगेश मुरकुटे यांनी केले. शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयात आयोजित ‘प्रकृती-संवाद : जल, जंगल, जमीन’ या चित्रकार्यशाळेत अतिथी व्याख्याता म्हणून ते बोलत होते. शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, नागपूर तथा रझा फाउंडेशन, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १८ ते २१ नोव्हेंबर दरम्यान चार दिवसीय राष्ट्रीय स्तरीय ‘प्रकृती-संवाद : जल, जंगल, जमीन’ चित्र व मुद्रणचित्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बुधवार दिनांक १९ नोवम्बर रोजी ‘पाणी आणि नदी’ या विषयावर डॉ. योगेश मुरकुटे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष मार्गदर्शन केले.
 
 
18-nov-21
 
 
 
याविषयी पुढे बोलताना डॉ. मुरकुटे यांनी नद्यांचे बदलते स्वरूप, भूजलाची घटती पातळी आणि जतनाची तातडीची आवश्यकता यावर भर देत विद्यार्थ्यांना संवेदनशील संदेश दिला. नद्या-काठची वसलेली मानवी सभ्यता आणि त्यातील बदल यांचे उदाहरण देत नदी ही केवळ जलवाहिनी नाही, ती संस्कृतीची वाहक असल्याचे त्यांनी पटवून दिले. पंचमहाभूतांच्या तत्त्वांवर आधारित या कार्यशाळेचा मुख्य हेतू प्रकृतीशी मानवाचा तुटत चाललेला संवाद नव्याने प्रस्थापित करणे हा आहे. विद्यार्थ्यांना निसर्गाचे निरीक्षण, अनुभव, दृश्यभाषेतील चिंतन व अभिव्यक्ती यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. कार्यशाळेची संकल्पना व प्रदर्शन संयोजक शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाचे अधीक्षक प्रा. डॉ. विश्वनाथ साबळे हे आहेत.
 
 
गुरुवार, २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, दीक्षाभूमीसमोर, लक्ष्मीनगर येथेच ‘सांझरंग’ हा सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सॅक्सोफोनवादक निलेश गवई, गायक-वादक कोविद सोनवणे आणि तबला-काहोनवादक कनक मसराम हे कलावंत हा कार्यक्रम सादर करणार आहेत.तर संगीत कार्यक्रमाची रचना व निवेदन मनोज मोहिते सांभाळणार आहे. हा कार्यक्रम नि:शुल्क असून नागपूरकर रसिकांसाठी खुला आहे.
Powered By Sangraha 9.0