पक्षी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक

02 Nov 2025 21:33:39
अमरावती,
Praveen Singh Pardeshi पक्षीमित्र संमेलनास मोठा इतिहास आहे. तीस वर्षापूर्वी याची सुरुवात झाली तेव्हा आपण त्याचे साक्षीदार होतो. काळ बदलत आहे. पक्षी संवर्धनाच्या चळवळीत लोकसहभाग आवश्यक असल्याचे मत मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांनी व्यक्त केले.
 
 
 

Praveen Singh Pardeshi  
अमरावती येथे शनिवार व रविवार असे दोन दिवसीय महाराष्ट्र पक्षीमित्र संयोजित वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था अमरावतीद्वारा आयोजित तिसरे अखिल भारतीय व ३८ वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन पार पडले. रविवारी झालेल्या समारोपात ते बोलत होते. माजी संमेलनाध्यक्ष निल माळी, महाराष्ट्र पक्षी मित्रचे अध्यक्ष जयंत वडतकर, संमेलन आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. गजानन वाघ, स्वागताध्यक्ष डॉ. अंजली देशमुख, सहसचिव डॉ. मंजुषा वाठ, उपाध्यक्ष श्रीकांत वर्‍हेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रवीण परदेशी यांनी भारतातील नष्ट होणार्‍या पक्षी प्रजातींचा आढावा घेतला. यासाठी बिएनएचएस संस्थेतर्फे राबविण्यात येणार्‍या विविध प्रकल्पांची माहिती दिली. संमेलनासाठी संपूर्ण राज्यातून व राज्याबाहेरून किमान ३०० प्रतिनिधी उपस्थित होते. दोन दिवसात तीस पक्षी मित्रांनी विविध विषयावर आपले सादरीकरण केले. त्यात सर्वात छोटा पक्षी निरीक्षक दहा वर्षाचा होता आणि त्याने अतिशय उत्तम असे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळविली. यशस्वीतेसाठी किरण मोरे, मनीष ढाकूलकर, सौरभ जवंजाळ, डॉ. चोंडेकर आदींनी परीश्रम घेतले.
दोन ठराव मंजूर
पक्षीमित्र संमेलनात दोन महत्वपूर्ण ठराव घेण्यात आले. यात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे नाव देण्यात यावे असा ठराव डॉ. जयंत वडतकर यांनी मांडला. तो सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. दुसरा ठराव हा पक्षी अधिवासांना भटक्या कुत्र्यांपासून धोका वाढत आहे. अशा भटक्या कुत्र्यांना आळा घालण्यासाठी संबंधित यंत्रणांनी उपाययोजना कराव्या असा होता. तो देखील मंजूर करण्यात आला.
प्रवीणसिंह परदेशी
Powered By Sangraha 9.0