ठाणेदारांसह ९ पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल

02 Nov 2025 21:24:02
चांदूर रेल्वे,
Chandur Railway police custody death चांदूर रेल्वे पोलिस स्टेशनच्या ताब्यात असताना झालेल्या आरोपी नितेश मेश्राम (वय ३२, रा. मिलींद नगर, चांदूर रेल्वे) यांच्या मृत्यूप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी तत्कालीन ठाणेदार अजय कवडुजी अहिरकर यांच्यासह ९ पोलिस कर्मचार्‍यांवर खुनाचा गुन्हा (कलम ३०२, ३४ भादंवी) दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा नोंदविण्याची कारवाई करण्यात आली. या घटनेने संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे. आरोपी पोलिसांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
 


trt  
.
११ जून २०२४ रोजी चांदूर रेल्वे पोलिसांनी न्यायालयाच्या वॉरंटनुसार नितेश मेश्राम यांना अटक केली होती. रात्री घरातून उचलून आणल्यानंतर त्यांची ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीत फिटनेस योग्य असल्याचे सांगितल्यावर त्यांना अटक करण्यात आली. मात्र अटकेदरम्यान पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे नितेश यांना गंभीर दुखापत झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. ११ जून रोजी दुपारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले. तथापि, उपचारादरम्यान १३ जून २०२४ रोजी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात शरीरावर १६ मारहाणीच्या जखमा आढळल्या होत्या. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांवर खुनाचा आरोप करत दीर्घ लढा दिला.
मृतकाच्या कुटुंबीयांनी १७ महिन्यांपासून न्यायासाठी धडपड चालवली होती. त्यांनी ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. १९ जुलै २०२४ रोजी दोषींवर कारवाईचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतरही ठोस कारवाई झाली नव्हती. अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला असून, मेश्राम कुटुंबाचा संघर्ष फळाला आला आहे. या प्रकरणात ठाणेदार अहिरकर यांच्यासह पोलिस कर्मचारी राजकुमार जैन, विशाल रंगारी, प्रवीण मेश्राम, अलीम गवळी, अमोल घोडे, प्रशांत ढोके, अश्विनी आखरे, सरिता वैद्य तसेच अन्य तीन पोलिस कर्मचार्‍यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाची दखल अनुसूचित जाती-जमाती आयोगाने घेतली होती. आयोगाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम यांनी १३ जानेवारी रोजी चांदूर रेल्वेला येऊन मेश्राम कुटुंबीयांची भेट घेतली होती. आयोगाने पोलिसांच्या तपासातील त्रुटी अधोरेखित करत विशेष तपास पथक स्थापन करण्याची शिफारस केली होती. यानंतर डॉक्टर, सुरक्षा रक्षक व इर्विन रुग्णालयातील कर्मचार्‍यांचे जबाब नोंदविण्यात आले. तपासात निष्काळजीपणा आढळल्याने आयोगाने एससी/एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाईचे निर्देश दिले होते. फ्रेजरपुरा पोलिसात दाखल करण्यात आलेला हा झिरो एफ.आय.आर. पुढील तपासासाठी चांदूर रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0