वर्धा,
animal husbandry उन्हाळ्याच्या दिवसात नेहमीच जिल्ह्यात चारा टंचाई ही समस्या कमी अधिक प्रमाणात डोकेवर काढते. यावर मात करण्याच्या उद्देशाने पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यातील तब्बल ७ हजार ५५० पशुपालकांना चारा लागवड योजनेचा लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाची दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम/ वैरण व पशुखाद्य कार्यक्रम योजना जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. चारा उत्पादन कार्यक्रम योजनेकरिता अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. दूध उत्पादन वाढीसाठी दुधाळ पशुधनास पुरेशा प्रमाणात व पौष्टिक चारा उपलव्ध व्हावा व दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी चार्याची तूट कमी व्हावी याकरिता योजना राबविण्यात येत असून योजनेव्दारे ७ हजार ५५० पशुपालकांना लाभदेण्याचे उद्दिष्ट आहे. प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार लाभ देण्यात येणार आहे.
प्रति लाभार्थी १ हेटरच्या क्षेत्रात वैरण उत्पादन घेण्यासाठी १०० टक्के अनुदानावर वैरण बियाण्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयामध्ये संपर्क साधावा. शिवाय आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह अर्ज सादर करावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन व पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुत डॉ. जगदीश बुकतरे यांनी केले आहे.
भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयामध्ये संपर्क साधावा. ७५५० पशुपालकांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असल्याचे डॉ. जगदीश बुकतरे यांनी सांगितले.