आमगाव,
Gondia cow smuggling racket, जिल्ह्यातील गोवंश कमी किमतीत खरेदी करून कत्तलखान्याकडे पाठविणार्या गौवंश तस्करांचे मोठे रॅकेट सक्रिय आहे. ही बाब माहिती असूनही प्रशासन मौन आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. यावर तातडीने कारवाई करावी, अन्यथ बजरंग दलातर्फे जिल्ह्यात आंदोलन करण्याचा इशारा बजरंग दल जिल्हा गौरक्षाप्रमुख बालाराम व्यास यांनी दिला आहे.
व्यास यांनी म्हटले आहे, भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. जिल्ह्यात शेतीच्या पूरक उपक्रम म्हणून मोठ्या प्रमाणावर पशुपालन केले जाते. महाराष्ट्रात गौमातेला राज्यमातेचा दर्जा मिळाल्यानंतरही जिल्ह्यात पशुतस्करांकडून जनावरांना कत्तलीसाठी नेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यामागे एक फार मोठे रॅकेट सक्रिय आहे. जनावरांना कमी किमतीत खरेदी करून नागपूर, हैदराबाद येथे पाठवले जात आहे. सरकारने गोवंशाच्या कत्तलीवर बंदी घातली असून जनावरांच्या वाहतुकीसाठी शिक्षेची तरतूदही केली आहे. परंतु त्या कायद्याचे प्रभावीपणे पालन होत नाही, म्हणूनच गोतस्करांचे मनोबल वाढले आहे. मवेशी बाजारात जनावरांची खरेदी केल्यानंतर २० ते २५ किलोमीटर चालवून वाहनांपर्यंत नेले जाते. ग्रामीण भागांतून अतिशय गुप्तपणे गोवंश ट्रकांमध्ये भरून कत्तलखान्यांकडे पाठवले जातात. मवेश्यांचा सर्वात मोठा बाजार चंगेर्यात आहे, जिथे हजारोंच्या संख्येने गोतस्करी केली जाते. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, आमगाव, सालेकसा, देवरी, सडक अर्जुनी, गोंदिया या तालुक्यांमध्ये गोतस्कर नेहमीच सक्रिय दिसतात. ही बाब माहित असूनही प्रशासन मौन आहे. गोतस्करी थांबवण्यासाठी ग्रामस्तरावर जनप्रतिनिधी, युवक, अधिकारी, कर्मचारी यांच्या समित्या गठीत केल्या पाहिजेत. बजरंग दलाचे कार्यकर्ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गौमातेचे रक्षण करत आहेत आणि करत राहतील. जर जिल्ह्यातून गोवंश हत्या आणि गोतस्करी बंद झाली नाही, तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून गोंदिया जिल्ह्यात आंदोलन करण्यात येईल. गौमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणीही बालाराम व्यास यांनी केली आहे.