होबार्ट,
IND vs AUS अखेर टीम इंडियाने टी-२० मालिकेत जोरदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियावर ५ विकेटने मात केली. होबार्ट येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात अर्शदीप सिंगच्या अचूक गोलंदाजीसह वॉशिंग्टन सुंदरच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. मालिकेत प्रथमच नाणेफेक जिंकत भारताने त्याचा पूर्ण फायदा घेत विजय आपल्या नावावर केला.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत १८६ धावांचा भक्कम डाव उभारला. मात्र भारतीय फलंदाजांनी आत्मविश्वासाने खेळ करत हा आव्हानात्मक लक्ष्य १९व्या षटकात ५ गडी राखून पार केला. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले होते. परंतु या वेळी भारताने फलंदाजीतील कमकुवतपणा दूर करत जबरदस्त प्रत्युत्तर दिले आणि होबार्टच्या मैदानावर आपला पहिला टी-२० विजय नोंदवला.
अर्शदीप आणि वरुणची प्रभावी गोलंदाजी
ऑस्ट्रेलियाने डावाची IND vs AUS सुरुवात करताच भारतीय गोलंदाजांनी दबाव आणला. संघात परतलेल्या अर्शदीप सिंगने केवळ ३५ धावांत ३ बळी घेत ऑस्ट्रेलियाचा टॉप ऑर्डर हादरवला. त्याने तिसऱ्या षटकापर्यंत दोन महत्त्वाचे विकेट घेत भारताला सुरुवातीचा फायदा मिळवून दिला. त्यानंतर टिम डेविडने तुफानी फलंदाजी करत केवळ २३ चेंडूत अर्धशतक झळकावले आणि संघाला संकटातून बाहेर काढले. तथापि, वरुण चक्रवर्तीने एकाच षटकात दोन विकेट घेत ऑस्ट्रेलियाच्या धावगतीवर ब्रेक लावला.
डेविड (७४) आणि IND vs AUS मार्कस स्टॉयनिस (६४) यांनी मात्र आक्रमण कायम ठेवले. डेविड बाद झाल्यानंतर स्टॉयनिसने मॅथ्यू शॉर्ट (२६ नाबाद) सोबत भागीदारी करत संघाला १८६ धावांपर्यंत नेले.भारतीय डावाची सुरुवात अभिषेक शर्मा (२५) आणि शुभमन गिल (१५) यांनी केली. अभिषेकने काही आकर्षक फटके खेळले पण मोठी खेळी करू शकला नाही. गिलचा खराब फॉर्म येथेही कायम राहिला. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव (२४) ने येताच चेंडू सीमारेषेबाहेर पाठवण्यास सुरुवात केली, परंतु तोही जास्त वेळ टिकला नाही.तिलक वर्मा (२९) ने डाव स्थिरावण्याचा प्रयत्न केला आणि भारताला १४५ धावांपर्यंत नेले. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने क्रीजवर आल्याबरोबरच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेतला. सुंदरने आकर्षक फटकेबाजी करत भारतीय डावाला गती दिली. जितेश शर्मा (२२ नाबाद) सोबत त्याने निर्णायक भागीदारी करत १९व्या षटकात भारताला विजय मिळवून दिला. सुंदर ४९ धावांवर नाबाद राहिला आणि आपले पहिले अर्धशतक थोडक्यात हुकले.या विजयासह भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधत आत्मविश्वास परत मिळवला आहे. मालिकेतील चौथा सामना गुरुवार, ६ नोव्हेंबर रोजी गोल्ड कोस्ट येथे खेळला जाणार असून, तेथे टीम इंडियाला मालिकेत आघाडी घेण्याची संधी असेल.