वर्धा,
Sanskar Bharati, वर्धेत कार्तिकी एकादशीची प्रभात म्हणजे भक्तीच्या झर्याने ओथंबलेली सकाळ! पहाटेच्या धुयातून सूर्यकिरणांनी डोकावत असताना, संस्कार भारतीच्या वतीने निघालेल्या वारीने वर्धेच्या रस्त्यांना भक्तिरसाचा सुवर्ण किनारा दिला. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या गजरात शहर जागं झालं जणू प्रत्येक मन विठ्ठलनामात विलीन झालं. या वारीत वय वर्षे ३ ते ९७ वर्षांचे आजोबा डॉ. राममोहन बैंदूरही सहभागी झाले होते.
संत सखुमय मंदिरातून निघालेल्या वारीत भगवे झेंडे डोलत होते, टाळ-चिपळ्यांच्या नादात पाऊलवाट ताल धरत होत्या. तरुण, आणि लहानग्यांच्या उत्साही जयघोषाने दिंडी जणू एक चालती कविता बनली होती. संस्कार भारतीच्या कार्यकर्त्यांनी पारंपरिकतेचा धागा आधुनिकतेशी जोडत भक्तीला सामाजिक जाणिवेची पाखर दिली. वाटेत रांगोळ्या काढून, फुलांनी स्वागत करण्यात आले.
वारीचा समारोप सावंगी येथील प्राचीन विठ्ठल मंदिरात सामूहिक आरतीने झाला. त्या क्षणी शेकडो ओठांवर एकच नाम गूंजत होतं पांडुरंग हरी. विठ्ठल मंदिरामध्ये जळीत, प्रल्हाद मानकर, संजय टिळले पेंटर आदींनी विठ्ठल चरणी अभंगांची सेवा अर्पण केली. सूर्यकिरण मंदिराच्या कळसावर पडले आणि वातावरणात मंद घंटानाद घुमला जणू स्वतः विठ्ठलच त्या भक्तीत सहभागी झाला होता. ही वारी म्हणजे केवळ प्रवास नव्हे ती एक अनुभूती होती.
संस्कार भारतीSanskar Bharati, व कलोपासक संघातर्फे गेल्या सहा वर्षांपासुन वर्धेतील सर्व क्षेत्रातील कलाकारांना तसेच विठ्ठल भक्तांना एकत्रित पायी वारीचे आयोजन करण्यात येते. यावर्षीच्या वारीचे वैशिष्ट्य म्हणजे केतकी कुलकर्णी व संस्कृती कुलकर्णी यांनी संपूर्ण वारी अनवानी पूर्ण केली. बाल वारकरी स्पृहा व अभिराम किन्हेकर, चैतन्य फडके, शर्वरी जोशी यांनी पायी चालत वारी पूर्ण केल्याने नवीन पिढीकडे संस्कृतीच्या हस्तांतरणाचा हा सुंदर सोहळा ठरावा. दरवर्षी नेमाने येणारे वारकरी पांडुरंग भालशंकर यांचे प्रतिनिधीक स्वरूपात पाय धुवून वारीचे मार्गक्रमण करण्यात आले.यशस्वीतेकरिता केतकी कुलकर्णी, श्याम सरोदे, किरण पट्टेवार, मंगेश परसोडकर, सुरेश पट्टेवार, पंकज घुसे आदींनी परिश्रम घेतले.
तभाचे तुळशी वृंदावन डोयावर
तरुण भारतच्या शताब्दी वर्षांनिमित्त तुळस लावा अभियानानंतर आता तुळशीचे सामूहिक विवाह हे अभियान आज रविवारपासुन राबवण्यात येत आहे. त्यासाठी तभाकडून देण्यात आलेल्या किटमधील तुळशीचे आकर्षक वृंदावन डोयावर घेऊन वारीत पायी चालण्याचा मोह महिलांना आवरता आला नाही. एवढेच नव्हे तर डोयावर तुळशी वृंदावन घेत महिलांनी घेरही धरला.