उमरखेड उपजिल्हा रुग्णालयात आता विनामूल्य डायलिसिसची सुविधा

02 Nov 2025 16:00:02
यवतमाळ,
Sanjay Rathod यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे उमरखेड येथील 8 खाटांच्या मोफत डायलिसिस सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे उमरखेड आणि लगतच्या परिसरातील किडनी (मूत्रपिंड) आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध होणार असल्याने दिलासा मिळेल, असा विश्वास पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला.
 
 
Sanjay Rathod
उमरखेड तालुक्यात कार्यरत असलेल्या 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात हे अत्याधुनिक डायलिसिस सेंटर स्थापन करण्यात आले आहे. परिसरातील रुग्णांची वाढती संख्या आणि उपचारांची गरज लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
यावेळी बोलताना पालकमंत्री राठोड म्हणाले, या मोफत डायलिसिस सेंटरमुळे उमरखेड परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुलभ होणार आहे. आतापर्यंत रुग्णांना उपचारांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या शहरांमध्ये जावे लागत होते, ज्यामुळे त्यांना प्रवासाचा मोठा ताण सहन करावा लागत होता आणि उपचारांवरील आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. आता हे मोफत केंद्र सुरू झाल्यामुळे नागरिकांचा हा त्रास दूर होईल आणि त्यांना वेळेवर व सोयीस्कर मोफत उपचार मिळतील.
 
 
याप्रसंगी जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व परिचारिका उपस्थित होत्या. तसेच, उमरखेड येथे आमदार किसन वानखेडे, भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मांडण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. डोंगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे, चितांग कदम उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0