वरोडा,
Wardha River, तालुक्यातील तुळाणा येथील वर्धा नदीवर रविवारी, 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेल्या चार शाळकरी मुलांपैकी दोघांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
रविवारी शाळेला सुट्टी असल्यामुळे दुपारी रुपेश विजेंद्र कुळसंगे (13), प्रणय विनोद भोयर (15), उमंग धर्मेंद्र आत्राम (15) आणि कृष्णा चंद्रकांत कोयताडे (16, रा. सर्व वरोडा) हे तुळाणा येथील वर्धा नदीवर पोहण्याकरिता गेले व नदीत उतरले. यापैकी रुपेश व प्रणय यांनी प्रथम नदीत उडी घेतली. मात्र, थोड्याच वेळात ते दोघेही गटांगळ्या खायला लागले व पाण्यात दिसेनासे झाले. त्यानंतर, नदी काठावर उभ्या असलेल्या उमंग व कृष्णा या दोन मित्रांनी आरडाओरडा केला, त्यानंतर आजूबाजूचे लोक गोळा झाले.
घटनेची माहिती पोलिस पाटील बंडू ढेंगळे यांना मिळताच त्यांनी लगेच पोलिसांना कळविले. पोलिसांनी चंद्रपूर येथून बचाव पथकाला पाचारण केले. मात्र, सायंकाळ होईपर्यंत दोघेही बचाव पथकाच्या हाती लागले नाही. सोमवारला बचाव पथक दोन्ही मुलांचा शोध घेणार असल्याचे पोलिस उपनिरीक्षक मनोज वासाडे यांनी सांगितले. पुढील तपास वरोडा पोलिस करीत आहे.