एका रात्रीत पाकिस्तानात आले अडीच लाख रोहिंग्या!

20 Nov 2025 15:00:30
इस्लामाबाद
250,000 Rohingyas arrived in Pakistan पाकिस्तानात एका दिवसात रोहिंग्या मुस्लिमांची संख्या तब्बल अडीच लाखांनी वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र ही वाढ अचानक झालेली नसून, सौदी अरेबियात राहणाऱ्या 2.5 लाख रोहिंग्यांना पाकिस्तानने कायदेशीर मान्यता देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही आकडेवारी बदलली आहे. पाकिस्तानी गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी सौदी अरेबियाचे राजदूत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ही घोषणा केली असून लवकरच याबाबतचा औपचारिक करार होणार आहे. नक्वी यांनी सांगितले की, अनेक दशकांपासून सुरू असलेला हा वाद एका बैठकीत मार्गी लावण्यात आला असून यामुळे पाकिस्तान–सौदी संबंध अधिक दृढ होतील. सध्या म्यानमार आणि बांगलादेशनंतर पाकिस्तानमध्ये रोहिंग्यांची सर्वाधिक लोकसंख्या आहे. देशात सध्या सुमारे चार लाख रोहिंग्या राहत असून आता सौदीत असलेल्या 2.5 लाखांना कायदेशीर दर्जा दिल्यामुळे ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
 
 
pakistan rohingya
 
१९६० च्या दशकात पाकिस्तानातील मोठ्या रोहिंग्या समुदायाने रोजगाराच्या शोधात सौदी अरेबियात स्थलांतर केले होते. त्या वेळी सौदीने त्यांच्या पाकिस्तानी पासपोर्टच्या आधारे त्यांना तात्पुरता आश्रय दिला होता. २०१२ पर्यंत पाकिस्तान त्यांचे पासपोर्ट नियमितपणे नूतनीकरण करत होता, पण नंतर नागरिकत्वाच्या अटींवरून हे नूतनीकरण थांबवण्यात आले. यामुळे 13 वर्षे पाकिस्तान–सौदी यांच्यात तणाव निर्माण राहिला. पाकिस्तानाने सौदीकडे रोहिंग्यांना नागरिकत्व देण्याची मागणी केली होती, तर सौदी अरेबियाने स्पष्ट केले होते की त्यांना नागरिकत्व देणे शक्य नाही; पाकिस्तानने त्यांना परत स्वीकारावे किंवा त्यांच्या कागदपत्रांचे नूतनीकरण करावे. अखेर पाकिस्ताननेच आपली चूक स्वीकारत 2.5 लाख रोहिंग्यांना अधिकृत मान्यता देण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे देशातील अधिकृत लोकसंख्येत वाढ झाल्याचे मानले जात आहे.
 
 
रोहिंग्या हे मूळचे म्यानमारमधील अराकान प्रदेशातील रहिवासी असून, तेथे 9व्या शतकापासून वास्तव्य करत आहेत, असा त्यांचा दावा आहे. मात्र म्यानमार सरकार त्यांना आपले नागरिक मानत नाही. त्यामुळे अनेक रोहिंग्या दहाव्या–एकोणिसाव्या शतकात भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशात स्थलांतरित झाले. आज संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार 1.2 दशलक्षाहून अधिक रोहिंग्या निर्वासित अवस्थेत आहेत. म्यानमारनंतर सर्वाधिक रोहिंग्या बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये राहत असून, अनेकांनी जगण्याच्या शोधात अरब देशांचा मार्ग धरला आहे. अलीकडे मात्र कोणताही देश या समुदायाला आश्रय देण्यास तयार नसल्याने त्यांची बिकट परिस्थिती कायम आहे. बांगलादेशने हा मुद्दा संयुक्त राष्ट्रांमध्ये अनेक वेळा उपस्थित केला आहे, पण अद्याप ठोस उपाय सापडलेला नाही.
Powered By Sangraha 9.0