चिखलदरा नगरपरिषदेत बिनविरोध विजय....मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

20 Nov 2025 15:22:49
चिखलदरा
Chikhaldara Municipal Council अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीत एक महत्त्वाचा राजकीय विकास घडत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वाढत चाललेल्या बिनविरोध निवडणुकांच्या मालिकेचा हा आणखी एक भाग ठरला आहे. यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीत १७ नगरसेवक आणि नगराध्यक्ष बिनविरोध निवडले गेले होते. त्याचबरोबर दोंडाई नगरपरिषदेत मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्या आणि सात नगरसेवकही विरोधाशिवाय विजयी झाले.
 
Chikhaldara Municipal Council
 
 
चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १०-ब मधून आल्हाद कलोती यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ असलेल्या कलोती यांच्या विजयासाठी स्थानिक पातळीवर मोठी हालचाल झाली. आमदार रवी राणा यांनी पुढाकार घेत प्रतिस्पर्धी उमेदवाराला माघार घ्यायला भाग पाडल्याने अखेर आल्हाद कलोती बिनविरोध विजयी झाले.
 
 
 
भाऊ, बिनविरोध झालं...
निवडणूक लढवण्याचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न असून त्यांच्या नावामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आमदार रवि राणा यांच्या प्रयत्नाने काँग्रेस उमेदवार शेख इर्शाद शेख जमील तसेच नथ्थू खडके नामदेव खडकेसह ९ उमेदवारानी आपले नामांकन मागे घेतले. विजयानंतर आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून माहिती दिली. ‘भाऊ, बिनविरोध झालं,’ असे त्यांनी सांगितल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही फोनवरून आल्हाद कलोती यांचं अभिनंदन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
Powered By Sangraha 9.0