वर्धा,
cultural festival Wardha शहरातील स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर वर्धा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पण, या कार्यक्रमासाठी सुरू असलेल्या तयारीसाठी चक १० वर्षे जुन्या डेरेदार वृक्षाचा विना परवानगी बळी घेण्यात आला. हा प्रकार उघडकीस आल्यावर वृक्ष व निसर्ग प्रेमींकडून या घटनेबाबत संताप व्यत केला जात आहे. सोबतच महोत्सवाच्या आयोजकांवर वनगुन्हा दाखल करण्याची मागणीही केली जात आहे.
वर्धा शहराचे हृदयस्थान असलेल्या धंतोली परिसरातील स्वावलंबी विद्यालयाचे हे एकमेव मोठे मैदान सध्या शहरात शिल्लक आहे. या मैदानावर क्रीडा स्पर्धांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन नेहमीच होतात. या ठिकाणी व्यायाम तसेच मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या संख्येने नागरिक दररोज सकाळी येतात. मैदान परिसर हरित व्हावा या हेतूने क्रीडा व वृक्षप्रेमींनी झाडे लावली. या झाडांना ट्रि-गार्डचे कवचही दिले. झाडांची योग्य निगा घेतल्या गेल्याने अतिशय कमी काळात रोपटे मोठेही झाले. या ठिकाणच्या झाडांची विविध कारणे पुढे करून कत्तल करण्यात आल्याने मोजकेच झाड शिल्लक राहिले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात या भागातील झाड वाटसरूंसाठी आधारदायी ठरते. पण, वर्धा महोत्सवाच्या तयारीसाठी मैदानात उभे असलेले १० वर्ष जुने झाड वन विभागाची कुठलीही परवानगी न घेता आयोजकांनी मुळासकट तोडल्याने वृक्ष व निसर्ग प्रेमींकडून संताप व्यत केला जात आहे. आयोजकांवर वनगुन्हा दाखल करण्याचा सूर उमटत आहे.
सामाजिक संघटनांकडून निषेध
गुरुवार २० रोजी दहा वर्ष जुने झाड तोडण्यात आल्याचा प्रकार उजेडात आल्यावर काही वृक्षप्रेमींनी आयोजकांशी संपर्क साधून विचारणा केल्यानंतर त्यांनी जबाबदारी स्विकारण्यास टाळाटाळ केली. एकीकडे वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षणाबद्दल शासन व प्रशासन स्तरावर प्रयत्न होत आहेत. तर दुसरीकडे कार्यक्रमांच्या निमित्ताने झाडांची कत्तल होत असल्याने हौशी क्रिकेट लब, माय मॉर्निंग ग्रुप, विदर्भ क्रिकेट लबसह स्वावलंबी मैदानावर येणार्या शंभरहून अधिक नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. वृक्षाची कत्तल करणार्यांवर वनगुन्हा दाखल करावा, अशी मागणीही केली जात आहे.