वाशीम,
District Collector Kumbhejkar निवडणूक ही व्यापक आणि संवेदनशील प्रशासकीय प्रक्रिया असून, प्रत्येक टप्प्यात काटेकोर नियोजन, अंमलबजावणी आणि विभागांमधील अचूक समन्वय अनिवार्य आहे. सर्व नोडल अधिकार्यांनी दिलेल्या वेळेच्या चौकटीत काम पूर्ण करून निवडणूक व्यवस्थापनात कोणतीही पोकळी राहू नये, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. नगर परिषद/नगरपंचायत तसेच आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी निवडणूकपूर्व प्रत्यक्ष तयारीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त बाबुराव बिक्कड यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडणूक काहीच दिवसांवर येऊन ठेपली असून मतदान २ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी वेळेच्या चौकटीत नियोजन पूर्ण करून प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी सज्ज राहावे, असे जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी स्पष्ट केले. या अनुषंगाने आतापर्यंत झालेल्या कामकाजावर सविस्तर चर्चा झाली.

बैठकीत मनुष्यबळ व्यवस्थापन आणि रॅन्डमायजेशन, मतपत्रिका व पोस्टल बॅलेट छपाई, मतमोजणी प्रशिक्षण, तसेच एसएसटी, एफएसटी, व व्हीएसटी यांच्या कार्यप्रणालीचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर निवडणूक साहित्याची साठवण, वाहतूक आणि वितरण व्यवस्था तसेच मतदार जनजागृती उपक्रमांवरही विशेष भर देण्यात आला. जिल्हाधिकारी कुंभेजकर म्हणाले, निवडणूक प्रक्रियेत मनुष्यबळ व्यवस्थापन, साहित्य वितरण, वाहतूक नियोजन आणि ईव्हीएम व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक विभागाने नेमून दिलेल्या जबाबदार्या वेळेत, अचूक व समन्वयातून पार पाडणे आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले. बैठकीत उपस्थित नोडल अधिकार्यांनी आपल्या विभागांतील प्रगतीचा आढावा सादर केला.